अहमदाबाद : गुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला. ८ आॅगस्ट रोजी राज्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर पक्षत्याग केलेल्या आमदारांची संख्या आता सात झाली.काँग्रेसने राज्यसभेसाठी अहमद पटेल यांना संधी दिली असून पक्ष सोडून जाणाºया आमदारांमुळे पक्षनेते काळजीत पडले आहेत. बालासिनोर मतदारसंघाचे आमदार मानसिंह चौहान यांनी राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष रमणलाल व्होरा यांना सकाळी दिला. वन्सदा येथील आमदार छन्नाभाई चौधरी यांनी अध्यक्षांकडे त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री राजीनामा सुपुर्द केला. रामसिंह परमार यांनी आज राजीनामा दिला.१८२ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे आता ५१ आमदार उरले आहेत. राज्यात येत्या वर्षअखेर विधानसभेच्या निवडणुका होणार असून गेल्या तीन निवडणुकांत पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला होता. त्याआधी विधानसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद असलेले बलवंतसिंह राजपूत, तेजश्रीबेन पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी गुरुवारी पक्ष सोडून थेट भाजपामध्ये प्रवेश केला. या दोघांनी विधानसभेचा आणि पक्षाच्या असलेल्या सगळ्या पदांचा त्याग करून गांधीनगरमध्ये भाजपाच्या कार्यालयात जाऊन पक्षात प्रवेश केला. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते.राज्यसभेच्या दोन जागांसाठी अमित शाह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उमेदवार आहेत. गुजरातमधून राज्यसभेवर ११ सदस्य असून त्यातील इराणी, दिलीपभाई पंड्या (दोघेही भाजपा) आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांची मुदत १८ आॅगस्ट रोजी संपत आहे. त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली असून बुधवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.गुजरातमध्ये काँग्रेसचे आमदार विकत घेण्यासाठी भाजपाने घोडेबाजार मांडला असून, कोट्यवधी रुपये आमदारांना देऊ केले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.गांधीनगर : भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणीयांनी आज गांधीनगर येथे राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचे अर्ज निवडणूक अधिकाºयांकडे सादर केले. काँग्रेसमधूनकालच बाहेर पडून भाजपामध्ये दाखल झालेले बलवंतसिंह रजपूत यांनीही अर्ज दाखल केला आहे. या तिन्ही उमेदवारांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही होते, अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस होता.
गुजरातमध्ये काँग्रेसचे आणखी तिघे गळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 4:01 AM