ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 22 - गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून यामध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील रेआसी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शुक्रवारी कुटुंब जेव्हा आपलं सर्व सामान घेऊन तलवारा परिसरात राहण्यासाठी जात होतं तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला झाला. गोरक्षकांनी लोखंडाच्या सळीने मारहाण केल्याचा आरोप आहे.
पीडित कुटुंबाने गोरक्षकांनी आमच्या सर्व सामानासहित कळप ज्यामध्ये बक-या, मेंढरं आणि गाई होत्या घेऊन गेले असल्याचं सांगितलं आहे. गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात नऊ वर्षाची मुलगी जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. "आम्ही एफआयर दाखल केला आहे. उधमपूरच्या डिआयजींना घटनास्थळी भेट देण्याचा आदेश दिला आहे. हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई केली जाईल", असं जम्मू काश्मीरचे पोलीस आयुक्त एस पी वैद यांनी सांगितलं आहे. पोलिसांना हल्लेखोरांपैकी पाच जणांची ओळख पटवण्यात यश मिळालं असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
"आम्ही तो भयानक हल्ला विसरु शकत नाही. त्यांना अमानुषपणे आम्हाला मारहाण केली. कसातरी आपला जीव वाचवत आम्ही तिथून पळ काढला. आमचा 10 वर्षाचा मुलगा अद्याप बेपत्ता आहे. तो जिवंत आहे की नाही हेदेखील माहित नाही. त्यांनी वयस्कर लोकांनाही खूप मारहाण केली. आमची हत्या करुन आमचा मृतदेह नदीत टाकण्याचा त्यांना प्लान होता", असं पीडितांपैकी एक नसीम बेगम यांनी सांगितलं आहे.
बक-या आणि मेंढरांशिवाय कुटुंबासोबत 16 गाई होत्या. त्यांना फक्त प्राण्यांचा हा कळप नाही तर सोबत असलेली कुत्रीही नेली असल्याचं त्यांनी सांगितलं.
जम्मू काश्मीरात मोठ्या प्रमाणात भटकी कुटुंब राहतात, जे दरवर्षी आपल्या सगळ्या सामानासहित जम्मूच्या हिमालय पर्वतांमधून काश्मीरपर्यंत प्रवास करत असतात.