बंगळुरु, दि. 7 - ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक 'लंकेश पत्रिका'च्या संपादक गौरी लंकेश यांना कदाचित एक आठवडाआधीच आपल्यावर होणा-या हल्ल्याची चाहूल लागली होती. त्यांनी यासंबंधी आपल्या आई आणि बहिणीसोबत चर्चाही केली होती. गेल्या काही दिवसांपासून आपल्या घराजवळ काही लोक संशयास्पदपणे वावरत आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र गौरी लंकेश यांनी यासंबंधी पोलिसांकडे कोणतीही तक्रार किंवा माहिती दिली नव्हती.
मंगळवारी गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश आपली गाडी पार्क करुन घराच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर सात गोळ्या झाडण्यात आल्या. गौरी लंकेश यांनी दरवाजाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला असता, तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यापैकी दोन छातीत तर एक गोळी डोक्यात शिरली आणि त्या मरण पावल्या. त्यांच्या घराच्या व्हरांड्यात असलेल्या सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे मारेकºयांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनीदेखील गौरी लंकेश यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा कधीही उल्लेख केला नसल्याचं सांगितलं आहे. 'त्या नेहमी मोठ्या अधिका-यांना भेटत असत, पण त्यांच्याकडेही कधी त्यांनी आपल्याला धोका असल्याची तक्रार केली नव्हती', असं त्यांनी सांगितलं.
गौरी यांच्या बहिण कविता लंकेश यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं आहे की, 'एका आठवड्याभरापुर्वी गौरी बानाशंकरी येथे आपल्या आजारी आईची भेट घेण्यासाठी आली होती. त्यावेळी गौरी आपल्या सुरक्षेवरुन चिंतित होती. आपल्या घऱाजवळ काही लोक संशयास्पद हालचाली करत असल्याचं तिने सांगितलं होतं. मी आणि आईने तिला पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला होता. पण गौरीने पुढच्या वेळी असे लोक दिसले तर नक्की तक्रार करेन असं सांगितलं'.
पोलिसांनी सांगितलं आहे की, 'कविता मंगळवारी दुपारी 2 वाजता गांधी बाजारमधील गौरी लंकेश यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी दोघींमध्ये जवळपास पाच मिनिटं चर्चा झाली होती. यानंतर त्या परत घऱी परतल्या. रात्री 8.26 वाजता त्यांनी गौरीच्या हत्येची माहिती मिळाली. जेव्हा त्या गौरी यांच्या घऱी पोहोचल्या तेव्हा कार गेटच्या बाहेर उभी असल्याचं त्यांनी पाहिलं. आणि गौरी लंकेश रक्ताच्या थारोळ्यात दरवाजाजवळ पडल्या होत्या'.
गौरी लंकेश आरआर नगरमधील आयडिअर होम्स टाऊनशिपमधील डुप्लेक्स हाऊसमध्ये एकट्या राहत होत्या. जेव्हा गौरी लंकेश यांची हत्या झाली तेव्हा परिसरातील वीज गेलेली होती. यामुळे पोलिसांनी मारेक-यांचा स्पष्ट फोटो मिळवण्यात अडचणी येत आहेत.