Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सध्या कर्नाटकात आहे. शुक्रवारी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या आई आणि बहीण या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. दोघांनी राहुल गांधींसोबत पदयात्रा केली. गौरी लंकेश यांच्या आई इंदिरा लंकेश आणि बहीण कविता लंकेश यांनी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर यात्रेत काही अंतर चालल्या देखील. राहुल गांधी यांनी इंदिरा लंकेश यांची गळाभेट घेत यात्रेत स्वागत केलं. पदयात्रेदरम्यान राहुल गांधी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या मातोश्रींचा हात धरुन चालताना दिसले.
गौरी लंकेश यांचे कुटुंबीय 'भारत जोडो यात्रे'त सामील झाले तेव्हा राहुल गांधी भावूक झाले. या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे. 'गौरी सत्याच्या बाजूने उभी राहिली. गौरी हिंमत करून उभी राहिली. गौरी स्वातंत्र्यासाठी उभी राहिली. मी गौरी लंकेश आणि त्यांच्यासारख्या असंख्य लोकांसाठी उभा आहे, जे भारताच्या खऱ्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात. भारत जोडो यात्रा हा त्यांचा आवाज आहे आणि तो कधीच शांत करता येणार नाही", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
घाबरणार नाही, झुकणार नाही आणि थांबणार नाहीकाँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर यासंबंधीचा एक फोटो शेअर केला आहे. "दिवंगत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांचे कुटुंब भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत आले होते. गौरी लंकेश यांचा धाडसी आणि निर्भीड आवाज द्वेष आणि हिंसाचाराच्या प्रतिनिधींनी दाबला होता. देशात पसरलेल्या या द्वेषाच्या विरोधात ही यात्रा सुरु आहे. आता आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, थांबणार नाही", असं काँग्रेसनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री राजराजेश्वरी नगर, बेंगळुरू येथील त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
एका देशात दोन ''भारत'' मान्य नाहीउद्योगपतींची कर्जमाफी आणि शेतकरी आत्महत्यांशी संबंधित मुद्दे उपस्थित करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'दोन भारत' एका देशात मान्य नाही, असं ट्विट राहुल यांनी केलं. 'काल मी एका महिलेला भेटलो, तिच्या शेतकरी पतीने 50,000 रुपयांच्या कर्जामुळे आत्महत्या केली. एक भारत, भांडवलदार मित्रांना ६ टक्के व्याजाने कर्ज आणि कोटींची कर्जमाफी. दुसरा भारत, अन्नदात्यांचे २४ टक्के व्याजावर कर्ज आणि संकटांनी भरलेले जीवन", असं ट्विट राहुल यांनी केलं होतं.