गौरी लंकेश हत्या प्रकरण- राहुल गांधींचे आरोप मूर्खपणाचे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 03:24 PM2017-09-06T15:24:44+5:302017-09-06T15:29:34+5:30
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी बंगळुरुत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
नवी दिल्ली, दि. 6- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची मंगळवारी बंगळुरुत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेवरून राजकारण्यांमध्ये एकमेकांवर टीका सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे. विरोधी विचारसरणीला बळाने दाबून टाकण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. लंकेश यांची हत्या संघाशी संबंधित लोकांनी केली असल्याचे सूचक उद्गार काढत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी विचारांचे पंतप्रधान असल्याचा उल्लेख केला. राहुल गांधी यांच्या या आरोपावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टीका केली आहे. राहुल गांधींचे आरोप पूर्णपणे मूर्खपणाचे आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
राहुल गांधींचे आरोप मूर्खपणाचे असून त्यांच्या टीकेला कोणताही आधार नाही. सगळे आरोप बिनबुडाचे आहेत, असा पलटवार नितीन गडकरी यांनी केला आहे. ‘मोदी सध्या भारतात नाहीत. प्रत्येक मुद्यावर पंतप्रधानांनी बोलावं, अशी अपेक्षा करता येऊ शकत नाही,’ असंही गडकरी म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुतोंडी - राहुल गांधींचा आरोप
गौरी लंकेश या पत्रकाराची बेंगळूरमध्ये झालेली हत्या दुर्दैवी असून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधानांना लक्ष्य केलं. विरोधी विचारसरणीला बळाने दाबून टाकण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप राहुल यांनी केला. लंकेश यांची हत्या संघाशी संबंधित लोकांनी केली असल्याचे सूचक उद्गार काढत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी हिंदुत्ववादी विचारांचे पंतप्रधान असल्याचा उल्लेख केला. तसंच, नरेंद्र मोदी जेव्हा बोलतात तेव्हा त्याचे दोन अर्थ निघतात. एक अर्थ त्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी असतो तर एक अर्थ तमाम दुनियेसाठी असतो असं सांगत मोदी हिंदुत्ववादी विचारांना बळ देत असल्याची टीका गांधी यांनी केली आहे. विरोधी विचारांचे आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होत असल्याचे गांधी म्हणाले.
काल मंगळवारी राहत्या घरी झाली गौरी लंकेश यांची हत्या
देशातील आघाडीच्या पत्रकारांपैकी एक असलेल्या गौरी लंकेश यांची बंगळुरूमधील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. रात्री आठ सव्वाआठच्या सुमारास तीन ते चार हल्लेखोरांनी गौरी यांच्या घरात घुसले आणि त्यांनी जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांच्यावर हा हल्ला का करण्यात आला. तसेच त्यांच्यावर हल्ला करणारे कोण होते. याबाबत काहीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
55 वर्षीय गौरी लंकेश या साप्ताहिक लंकेश पत्रिकाच्या संपादक होत्या. तसेच त्या विविध वर्तमानपत्रांमध्ये लिखाण करायच्या. त्यांनी उजव्या विचारसरणीच्या प्रवृत्तीवर सातत्याने टीका केली होती.