बेंगलोर- पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाबद्दल सुरू असलेल्या एसआयटी चौकशीमध्ये नवीन माहिती समोर आली आहे. सनातन आणि हिंदू जनजागृती समिती या हिंदुत्ववादी संघटनांशी गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे जोडले असल्याची माहिती मिळते आहे. या प्रकरणात आतापर्यंत या दोन संघटनांची संबंधीत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गौरी लंकेश यांच्यावर गोळया झाडणाऱ्या आरोपी परशूराम वाघमारे (वय २६) याला जुलै २०१७ मध्ये बंगळुरुला बोलावण्यात आलं. गौरी लंकेश यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अमोल काळेने (वय ३७वर्ष) त्याला बंगळुरुच्या हद्दीबाहेर एका घरामध्ये ठेवलं होतं. हे घर सनातन संस्थेशी संबंधित एका व्यक्तीच्या नावे भाड्याने दिलं होतं. पुण्यात राहणार अमोल काळे हा हिंदू जनजागृती समितीचा माजी संयोजक आहे.
गौरी लंकेश यांच्या बंगळुरुतील घरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या घरात वाघमारे राहत होता. वाघमारे आणि काळे यांनी या घराचा एक तळासारखा वापर केला. एसआयटीच्या माहितीनुसार, याच घरात बसून हे दोघे गौरी लंकेश यांच्या घराचा सर्व्हे करायचे व हत्येची योजना आखली.
वाघमारे राहत असलेलं घर सुरेश कुमार नावाच्या इमारत कंत्राटदाराने बायको ृ जून २०१७ मध्ये भाडयावर घेतलं होतं. पण १० जुलै २०१७ रोजी घरातील सदस्य बाहेर गेले त्यावेळी आरोपी त्या घरामध्ये रहायला आले, अशी माहिती एसआयटीतील सूत्रांनी दिली. काळे आणि सुजीत कुमारच्या डायरीमध्ये या घराबद्दल माहिती एसआयटीला मिळाली आहे. हे दोघेही हिंदू जनजागृती समितीचे माजी सदस्य आहेत. काळे आणि सुजीत कुमारच्या मैत्रीमुळे सुरेशने ते घर काळेला राहण्यासाठी दिलं होतं, अशीही माहिती समोर येत आहे. सुरेशची आरोपींबरोबर सनातन संस्थेंच्या माध्यमातून ओळख झाली होती.