बंगळुरू : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी के.टी.नवीन कुमार याला मुख्य आरोपी घोषीत करण्यात आलं आहे. बंगळुरूच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात आरोपी नवीन कुमारच्या जामिनाला पोलिसांनी विरोध केला. आरोपीची चौकशी करण्यासाठी अजून वेळ हवा आहे अशी मागणी सरकारी वकिलांकडून न्यायालयात करण्यात आली. मागणी मान्य करत न्यायालयाने कुमार याला 5 दिवसांची एसआयटी (विशेष तपास पथक) कोठडी सुनावली. यावेळी सरकारी वकिलांनी या प्रकरणाचा आतापर्यंतचा चौकशी अहवाल बंद पाकिटात न्यायालयाकडे सुपूर्द केला. आरोपीची नार्को टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची मागणीही पोलिसांकडून करण्यात आली होती. पण याबाबत 12 मार्चला निर्णय घेतला जाईल असं न्यायालयाने म्हटलं.
पोलिसांनी नवीन कुमारला 18 फेब्रुवारी रोजी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी बेंगळुरूतील मॅजेस्टीक भागातील परिवहन महामंडळाच्या बस स्टॅण्डजवळून ताब्यात घेतले होते. त्यावेळी नवीन कुमारकडून एक ३२ कॅलिबर बंदूक आणि १५ जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली होती. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील ही पहिली अटक आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येचा उलगडा होण्याच्यादृष्टीने हे मोठे यश मानले जात आहे.
नवीन कुमारने गौरी लंकेशच्या मारेकऱ्यांना आश्रय देण्यासोबत हत्या करण्यासाठी सराव शिबिरासाठीची व्यवस्था केली असल्याची माहिती समोर आली आहे. नवीन कुमार हा मांड्या जिल्ह्यातील मद्दूर येथे राहणारा आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर पाच महिन्यानंतर विशेष पथकाला यश मिळाले. विशेष तपास पथकाने नवीन कुमार याच्या मित्रांनी दिलेल्या जबाबाकडे लक्ष वेध मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून कुमारच्या अटकेची मागणी केली होती. नवीन कुमारच्या मित्रांनी आपल्या जबाबात गौरी लंकेश यांच्या हत्येत नवीन कुमारचा सहभाग असल्याचे सांगितले होते. त्याआधारे पोलिसांनी नवीन कुमारला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर नवीन कुमारला सादर केले तेव्हा एसआयटीने गौरी लंकेश हत्याप्रकरणात आपला सहभाग असल्याचा नवीन कुमारच्या जबाबाची प्रतही दिली. याआधारे सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करत नवीन कुमारला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार नवीन कुमार याचे हिंदू युवा सेना, सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंध होते. गौरी लंकेश यांच्या हत्येआधी त्यांच्या घराबाहेर बाईकस्वार घराचे निरीक्षण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एसआयटीला सध्या फॉरेन्सिक अहवालाची प्रतिक्षा करत आहे. सीसीटीव्ही फूटेजमधील बाईस्कवाराची शरीरयष्टी नवीन कुमारशी मिळतीजुळती असल्याचे पोलिसांचा म्हणणे आहे. त्याशिवाय नवीन कुमार व अन्यजण गौरी लंकेशच्या घराबाहेर असल्याचे अन्य पुरावे पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.