‘अदानी’ला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व, शरद पवार यांचा घणाघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 06:57 AM2023-04-08T06:57:16+5:302023-04-08T06:57:36+5:30
जेपीसीची गरज नसल्याचे व्यक्त केले मत
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने अदानी उद्योगसमूहाबद्दल जो अहवाल प्रसिद्ध केला, तशा अर्थाची वक्तव्ये काही व्यक्तींनी याआधीही केली होती. त्यावेळीही संसदेत गदारोळ झाला होता; पण संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अदानी प्रकरणाला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देण्यात आले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. अदानी प्रकरणाच्या चौकशीबाबत संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
‘जेपीसी’साठी विरोधी पक्षांनी अधिवेशनात गदारोळ माजविला होता. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या या मागणीशी आपण सहमत नाही.
पवारांचे मुद्दे असे...
- अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमताना किती दिवसांत अहवाल सादर करावा, याची मुदतही सुप्रीम कोर्टाने ठरवून दिली आहे.
- जेपीसीमध्ये सत्ताधारी पक्षाचे बहुमत असेल, तर सत्य कसे बाहेर येईल हाही चिंतेचा विषय होता.
- अदानी व अंबानी उद्योगसमूहांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्या प्रकारे लक्ष्य करत आहेत, ते आपल्याला मान्य नाही.
- गतकाळात लोक टाटा-बिर्ला या उद्योगसमूहांनादेखील लक्ष्य करत होते.
१९ विरोधी पक्षांना दिसले आरोपांत तथ्य : काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगळे मत असू शकते. पण अदानी उद्योग समूहावर झालेले आरोप गंभीर असून, त्यात तथ्य आहे, असे २० समविचारी विरोधी पक्षांपैकी १९ पक्षांचे मत होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जयराम रमेश यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यांवर व्यक्त केली आहे.