हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समुहाला मोठा धक्का बसला आहे. अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये मोठी घट होऊन ते श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या १० मधून बाहेर पडले आहेत. मात्र आता हळुहळू त्यांच्या स्थितीत सुधारणा होत आहे. या दरम्यान, सध्या अदानींच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. अदानींचा धाकटा मुलगा जीत अदानीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. दिवा जेमिन शाह हिच्यासोबत जीत अदानीचा साखरपुडा झाला असून, या सोहळ्याला काही जवळची मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित होते.
जीत आणि दिवा यांचा साखरपुडा अगदी साधेपणाने करण्यात आला. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. साखरपुड्याचे जे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये जीत आणि दिवा हे दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. या जोडीने पेस्टल टोनमध्ये पारंपरिक पोशाष परिधान केला होता. मीडिया रिपोर्टनुसार हा साखरपुडा १२ मार्च रोजी संपन्न झाला. मात्र लग्नाची तारीख अद्याप ठरलेली नाही.
अदानी कुटुंबीयांची होणारी धाकटी सून दिवा जेमीन शाह ही एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. तिचे वडील हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या दिवा सी दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आहेत. त्यांची कंपनी मुंबई आणि सूरत स्थित आहे. या कंपनीची सुरुवात चिनू दोषी आणि दिनेश शाह यांनी केली होती. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दिवा जेमीन शाह तिच्या वडिलांना व्यवसायामध्ये मदत करते. तर अदानींची थोरली सून परिधी श्रॉफ ही कॉर्पोरेट वकील आहे.
जीत अदानी हे गौतम अदानी यांचे धाकटे पुत्र आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेंसिल्वेनिया येथून पदवी मिळवलेली आहे, ते २०१९ मध्ये अदानी समुहामध्ये कारभार पाहू लागले. २०२२ मध्ये जीत अदानी यांना अदानी समुहाचे उपाध्यक्ष बनवण्यात आले.