मुंबई - टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करुन चाहत्यांना धक्का दिला. गौतमच्या या गंभीर निर्णयाने चाहते भावूक झाले असून ट्विटरवरही गौतम गंभीर ट्रेंड होत आहे. मात्र, क्रिकेटला गुड बाय केल्यानंतर गौतम आता राजकारणात एंट्री करणार का, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. कारण, लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच गौतमने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे लवकरच राजकीय मैदानावर गौतमची फटकेबाजी पाहायला मिळू शकते.
आगामी 2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. आता सर्व पक्षांनाही दमदार उमेदवार निवडीचे वेध लागले आहेत. तसेच इच्छुक उमेदवारही उमेदवारीसाठी ज्या त्या पक्ष श्रेष्ठींकडे खेटे घालत आहेत. त्यातच, भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज आणि 2011 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील खरा हिरो गौतम गंभीरने निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांच्या मैदानात गौतम फलंदाजी करणार अशी चर्चा होत आहे. यापूर्वीही, भारतीय क्रिकेट संघांचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनी, विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याच्या बातम्या आल्या होत्या. विशेष म्हणजे देशाबद्दलच्या अनेक भूमिकांबद्दल त्याने मांडलेली मते. पाकिस्तानसोबतच्या वादाबद्दलची त्याची भूमिका, यावरुन गौतम गंभीर भाजपाकडून मैदानात उतरेल अशीही चर्चा होती. तर भाजपाही गौतमला दिल्लीतून तिकीट देऊ शकते, असे बोलले जात होते.
भाजपाच्या 'संपर्क फॉर समर्थन' अभियानावेली भाजापाध्यक्ष अमित शाह यांनी अनेक दिग्गजांची भेट घेतली होती. त्यावेळी, गौतम गंभीरचे नाव भाजपाचा उमेदवार म्हणून चर्चेत आले होते. मात्र, आता निवृत्ती घेतल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीकरिता तो भाजपमध्ये प्रवेश करू शकतो यावर काहींचे ठाम मत बनले आहे. सध्या भाजपच्या दिल्लीच्या खासदार मिनाक्षी लेखी यांच्या कामकाजावर भाजपचे पक्षश्रेष्ठी समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागेवर गंभीरला संधी मिळू शकते, अशी शक्यता आहे. तसेच गौतम गंभीर त्याच्या सामाजिक कार्यासाठीही प्रसिद्ध आहे. तर देशातील जवानांची बाजू घेताना आणि शहिदांच्या कुटुबीयांना मदत करण्यासाठी तो नेहमीच एक पाऊल पुढे टाकतो. तसेच तो मुळचा दिल्लीकर असल्याने त्याचाही फायदा भाजपाला होईल, असे एका वरिष्ठ भाजप नेत्याने यापूर्वी म्हटले होते.