नवी दिल्ली : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता राजकीय मैदानात उतरण्यासाठी भारताचा सलामीवीर गौतम गंभीर सज्ज झाला आहे. गौतम गंभीर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून त्याला भाजपाने पूर्व दिल्ली मतदार संघातून उमेदवारी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र, आज भाजपाने दिल्लीतील दोन जागांसाठी उमेदवारी जाहीर केली. यामध्ये गौतम गंभीरला पूर्व दिल्लीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मीनाक्षी लेखी यांना पुन्हा नवी दिल्लीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.
दरम्यान, गौतम गंभीरची विचारधारा ही भाजपासारखीच आहे. जेव्हा गौतम गंभीर दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद भूषवत होता. तेव्हा केंद्रीय मंत्री अरुण जेटली हे दिल्लीच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून अरुण जेटली आणि गौतम गंभीर या दोघांचे चांगले संबंध असल्याचे पाहायला मिळाले आहेत. गौतम गंभीर हा अरुण जेटली यांचा आवडता खेळाडू होता. त्याचबरोबर आता निवृत्त झाल्यानंतर गौतम गंभीर शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी कार्यरत आहे.
जम्मू-काश्मीर मुद्यावरून गौतम गंभीर-मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल 'वॉर'!जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून पीडीपी पक्षाच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीवर जोरदार टीका केली होती. मेहबूबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरला लागलेला 'डाग' असल्याची बोचरी टीका गंभीरने केली होती. यानंतर गौतम गंभीर आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच जुंपली होती. अखेरीस मेहबूबा मुफ्ती यांनी गौतम गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केले.