Gautam Gambhir reaction on Navjot Singh Sidhu: देशाचे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांनी नुकतंच एका कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा उल्लेख मोठा भाऊ म्हणून केला होता. सिद्धू यांच्या याच विधानावरुन आता गदारोळ उडाला आहे. माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीर यानं आता या वादात उडी घेतली असून सिद्धूंवर कठोर शब्दात टीका केली आहे.
गौतम गंभीर यानं सिद्धू यांच्या वक्तव्यावर उद्देशून एक सूचक ट्विट केलं आहे. आधी आपल्या मुलांना सीमेवर लढण्यासाठी पाठवा मग दहशतवाद पसरवणाऱ्या देशाच्या प्रमुखाला मोठा भाऊ म्हणा, असा खोचक टोला गंभीरनं सिद्धू यांचं नाव न घेता लगावला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देखील पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू राहिले आहेत. तर नवज्योत सिंग सिद्धू व गौतम गंभीर देखील भारतीय संघाकडून क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे तीन माजी क्रिकेटपटूंमध्ये आज राजकीय रिंगणात सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. नवज्योत सिंग सिध्दू यांच्याकडे पंजाब काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आहे. पण माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबतचा मोठ्या वादानंतर सिद्धू यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू जेव्हा करतारपूर बॉर्डरवर पोहोचले तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. याचवेळी इम्रान खान यांच्याबाबत सिद्धू यांनी वक्तव्य केलं होतं. इम्रान खान हे माझ्या मोठ्या भावासारखे असून त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे, असं विधान सिद्धू यांनी केलं होतं. भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला होता. त्यानंतर सिद्धू यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीकेला सुरुवात झाली आहे.