नवी दिल्ली : क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता राजकीय मैदानात उतरलेल्या गौतम गंभीर विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व दिल्लीमध्ये विनापरवानगी प्रचारसभेचे आयोजन केल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. शुक्रवारीच गंभीरवर मतदार यादीत दोनवेळा नोंदविण्यात आल्याचा आरोप करत गुन्हा नोंदविण्यात आला होता. यामुळे गंभारसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
पूर्व दिल्लीमधून गंभीरने काल कोणतीही परवानगी न घेता प्रचारसभा घेतली. याविरोधात आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. यावर आयोगाने दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांना गंभीरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, गंभारचे नाव दोन ठिकाणी असल्याच्या विरोधात आपने दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार दाखल केली होती. यावर 1 मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.
गौतम गंभीरजवळ राजेंद्र नगर आणि करोल बागमधील दोन मतदान कार्ड आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्याला एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा आरोप पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार आतिशी यांनी गौतम गंभीर केला आहेत. यावेळी आतिशी म्हणाल्या,'आम्ही याप्रकरणी गौतम गंभीरविरोधात तीस हजारी न्यायालयात गुन्ह्याची तक्रार केली आहे.'
तसेच, ट्विटरच्या माध्यमातून आतिशी यांनी गौतम गंभीरला मतदान करुन आपले मत व्यर्थ करु नका असे आवाहन केले आहे. 'गौतम गंभीरला मतदान करुन आपले मदतान व्यर्थ करु नका. त्यांना लवकरच दोन मतदान कार्ड बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविले जाईल. आपले मतदान व्यर्थ करु नका.'