नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी वकील गौतम खेतान याला काळ्या पैशांप्रकरणी ईडीने शुक्रवारी रात्री अटक केली. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने त्याला ईडीच्या कोठडीमध्ये देण्याचे आदेश राखून ठेवले असून आज सायंकाळी 5 वाजता याबाबत निर्णय देण्यात येईल.
खेतान याने बेकायदेशीररित्या परदेशांतील बँक खाती वापरली आहेत. त्याच्याकडे काळा पैसा असल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. अटक केल्यानंतर ईडीने त्याला पटियाला न्यायालयात हजर केले होते. खेतानविरोधात प्राप्तिकर विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेही याची दखल घेतली होती.
प्राप्तीकर विभागाने गेल्या आठवड्यात खेतानच्या विविध ठिकाणांवर छापे टाकले होते. ऑगस्टा वेस्टलँडचा मुख्य आरोपी ख्रिश्चियन मिशेल याच्या चौकशीमध्ये ईडीला खेतानकडील काळ्या पैशांची माहिती मिळाल्याची शक्यता आहे.
खेतानला सप्टेंबर 2014 मध्ये पहिल्यांदा अटक झाली होती. तर जानेवारी 2015 मध्ये जामीन मिळाला होता. यावेळी डिसेंबर 2016 लाही पुन्हा अटक झाली होती व जामीनावर मुक्तता झाली होती.