सध्या देशातील राजकीय वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक हैं तो सेफ हैं’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बंटेंगे तो कटेंगे’ घोषणांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच मध्य प्रदेश सरकारमधील एका भाजपच्या मंत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अजान ऐकून भाषण थांबवणारे मंत्री हे मंचावरूनच ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ म्हणताना दिसत आहेत. यावरून पुन्हा राजकीय चर्चांना वेग आला आहे.
मध्य प्रदेशमधील डॉ. मोहन यादव सरकारमधील गौतम टेटवाल हे मंत्री आहेत. राजगढ जिल्ह्यातील मऊ गावात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गौतम टेटवाल आले होते. गौतम टेटवाल हे भाषण करत असताना अजान सुरू झाली. अजान सुरू झाल्याचे ऐकताच गौतम टेटवाल यांनी भाषण थांबवले. ज्या वेळी हा कार्यक्रम होत होता, त्यावेळेस सव्वा सात वाजले होते आणि ईशाची नमाज होत होती. अजान संपल्यानंतर मंत्री गौतम टेटवाल यांनी संस्कृतमधील एक श्लोक म्हटला. ते म्हणाले, “वह कहता है कि उससे डरो, नेक काम करो। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।”. यानंतर त्यांनी मंचावरूनच ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अल्लाह…’, असेही पठण केले. गौतम टेटवाल यांचा यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल सध्या होत आहे. यावरून काहींनी त्यांच्यावर निशाणा साधला असून हिंदू समाजाची माफी मागावी, असे म्हटले आहे.
हिंदू समाजाची माफी मागावी - तिवारीमंचावरून भाजपच्याच मंत्र्याने कलमा पठण केल्यामुळे संस्कृती बचाव मंचाने विरोध केला आहे. संस्कृती बचाव मंचाचे अध्यक्ष चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, मंत्री सर्व धर्माचा आदर करतात यात दुमत नाही. मात्र, आम्ही हिंदुत्ववादी लोक त्यांच्यासाठी लढाई लढतोय. मंदिरात आरती सुरू असल्यावर कोणताच मंत्री आपले भाषण थांबवत नाही किंवा त्यात सहभागी होत नाही. पण अजान सुरू झाली की भाषण थांबवतात आणि आता तर स्वत: कलमा पठण करत आहेत. उद्या नमाजही पढतील, असा संताप चंद्रशेखर तिवारी यांनी व्यक्त केला. गौतम टेटवाल हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी हिंदू समाजाची माफी मागावी आणि आपण भर मंचावर जे केले ते योग्य आहे का याचा विचार करावा. आपण योग्य केले असे त्यांना वाटत असेल तर हिंदू समाजही त्यांच्याबाबत वेगळा विचार करायला मोकळा, असेही ते म्हणाले.