- माधुरी पेठकरनाशिक - गावात स्थिर राहणाऱ्या मुलांच्या (कु)पोषणाचा हिशेब ठेवून त्यांच्या पोटी दोन घास जावेत, यासाठी सरकारची यंत्रणा आहे. पण पाण्याने ओढ दिली की, जगण्यासाठी स्थलांतर करणाºया आईबापाबरोबर शहरांच्या आसºयाला जाणारी मुले मात्र पुन्हा उपासमारीच्या चक्रात अडकतात आणि पहिल्या पावसामागोमाग गावी परतेपर्यंत तीव्र कुपोषणाची शिकार होतात.एकात्मिक बालविकास कार्यक्रमातून मध्येच गळून जाणाºया अशा मुलांना ‘ट्रॅक’ करण्याची कोणतीच सुविधा नसल्याने एका अर्थाने पोषण कार्यक्रमाचे प्रयत्न मातीमोल होत असल्याचे चित्र राज्याच्या अनेक भागांत दिसते. सक्तीचे स्थलांतर आणि कुपोषण यांच्यातील परस्पर संबंधाचा विचार पोषण कार्यक्रमात दुर्लक्षिला गेला आहे.स्वत:ची शेती नाही. शेतमजूर म्हणूनही गावात काम नाही. जमिनीचा तुकडा असेल, तर तो कसायला पाणी नाही. गावात रोजगाराचे दुसरे साधन नाही. गाव जगवत नाही, म्हणून सक्तीचे स्थलांतर माथी मारल्या गेलेल्या आदिवासींची मुले पुन्हा पुन्हा कुपोषणाच्या चक्रात सापडत असल्याचे दिसते.नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या चिंचओहोळ या ग्रुप ग्रामपंचायतीच्या गावपाड्यावर फिरत असताना ‘कुपोषण आणि स्थलांतर’ हा दुहेरी पेच दिसतो.‘आता या भागात कुपोषित मुलांचे आकडे कमी दिसत असले तरी जूनमध्ये जेव्हा रोजगारासाठी म्हणून गावाबाहेर गेलेली माणसे गावात येतील तेव्हा कुपोषित मुलांची संख्या वाढलेली दिसेल’, असे येथील हतबल अंगणवाडीताई सांगतात. ग्रामीण भागात ० ते ६ वयोगटातील मुलांचे पोषण आणि लसीकरणाची जबाबदारी अंगणवाडी घेते. आई-वडिलांबरोबर ही मुले स्थलांतरित होतात, तेव्हा त्यांचा अंगणवाडीशी असलेला संबंध तुटतो. स्थलांतरित होणाºया गर्भवती माताही पोषक आहार, लसीकरण आणि जननी सुरक्षा योजनेतून होणाºया लाभांना मुकतात. खाण्या-पिण्याची आबाळ, अतोनात कष्ट यामुळे त्या कुपोषित राहतात आणि त्यांच्यापोटी येणारी मुलेही कुपोषित असतात.डाळी-साळी-मांसाहार हे आहार घटक गावात स्वस्तात उपलब्ध असतात. स्थलांतरानंतर मात्र या वस्तू उक्त्या विकत घेणे परवडत नाही. विस्कळीत होणाºया आहार संस्कृतीमुळे मुलांच्या आहारात पोषण कमतरता राहाते. मुले आजारी पडली तरी उपचार करणे स्थलांतरितांना परवडत नाही. तुटपुंज्या कमाईपुढे जगण्याचा संघर्ष मोठा असल्याने अपुरा आहार, अर्धपोटी राहणे हेच त्यांचे प्राक्तन बनून जाते.मात्र पोषण - अभियानाच्या एकूण रचनेत ‘स्थलांतर आणि कुपोषण’ हा विषय अद्याप दुर्लक्षितच राहिला आहे.जगण्यासाठी दाहीदिशा : रोजगाराचा शोध माणसांना कुठून कुठे नेतो ?पालघर-मोखाड्यातून नाशिक, मुंबई, वसई, ठाणे या शहरी भागात बांधकामे आणि वीटभट्ट्यांवर मजुरीसाठीमुरबाड, शहापूर भागातून ओतूर, जुन्नर, नगरच्या शहरी भागात वीटभट्ट्यांवर.अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळीपट्ट्यातून श्रीगोंदा, राहुरी, बारामती या ठिकाणी ऊसतोडीसाठीनंदूरबार जिल्ह्याच्या ६ तालुक्यांतून एक लाखांपेक्षा जास्त कुटुंबे आॅक्टोबर ते एप्रिल, असे सहा महिने गुजरातमध्ये ऊसतोडीसाठी जातात.नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या आदिवासी तालुक्यातून नाशिक शहर परिसरात बांधकाम आणि शेतमजुरीसाठीपूर्व विदर्भातील मेळघाटाच्या सीमेवरून मुंबई, पुणे आणि नाशिक या टोकाच्या शहरात.विदर्भात गडचिरोली आणि मेळघाटातून अमरावती, नागपूर, परतवाडा या शहरी भागापासून थेट मध्य प्रदेशापर्यंत मजुरीसाठी.
गावच सुटले, तर भाकरी कशी मिळणार? सक्तीच्या स्थलांतरामुळे कुपोषित मुले ‘पोषण अभियाना’च्या बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 5:39 AM