नवी दिल्ली : काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या नेतृत्वातील विरोधकांनी शून्य तासादरम्यान गाझामधील निष्पाप महिला आणि मुलांच्या नरसंहारावर तात्काळ चर्चा करण्याची मागणी करीत एकच गोंधळ घालून राज्यसभेचे कामकाज ठप्प केले. या विषयावर सोमवारी चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखविली; परंतु विरोधकांनी तात्काळ चर्चेची मागणी केल्याने दुपारपर्यंत दोनदा कामकाज तहकूब करावे लागले. युक्रेनमध्ये मलेशियन विमान दुर्घटनेत ठार झालेल्या २९८ प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर लगेच सीपीआय-एमचे सीताराम येचुरी म्हणाले, अशाच प्रकारे गाझामधील निष्पाप नागरिकांच्या नरसंहाराचा संदर्भ अध्यक्षांकडून यायला हवा. यूएनने म्हटल्याप्रमाणे ठार झालेले ७५ टक्के नागरिक होते. ठार झालेल्यांमध्ये ४६ टक्के महिला व मुले असून, १२ टक्के पाच वर्षांखालील मुले आहेत. मानवी दृष्टिकोनातून हा संदर्भ अध्यक्षांकडून यायला हवा, अशी विनंती त्यांनी केली. संदर्भाचा मुद्दा येचुरी आणि अध्यक्षांमधील आहे. सरकार गाझाच्या मुद्यावर सोमवारी चर्चेला तयार आहे, असे संसदीय कामकाज राज्यमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. मात्र, विरोधी बाकांवरील सदस्यांचे समाधान झाले नाही. चर्चा आज केली जाऊ शकते आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री सोमवारी उत्तर देऊ शकतात, असे विरोधी पक्षांचे म्हणणे होते. विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी लावून धरल्याने उपाध्यक्ष कुरियन यांनी १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. दुपारी कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सभागृहात तशीच परिस्थिती कायम होती. गदारोळात सरकारने कॅग अहवाल आणि दिल्लीचा २०१४-१५ चा अर्थसंकल्प सादर मांडला. त्यानंतर शून्य तासात देखील गोंधळ कायम असल्याने कुरियन यांनी दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गाझा : राज्यसभेत गोंधळ, सभागृह दोनदा तहकूब
By admin | Published: July 18, 2014 11:17 PM