नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करत जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते. तसेच, या दोन केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनेसाठी 31 ऑक्टोबर हा दिवस निश्चित केला होता. त्यानुसार, आजपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख दोन वेगवेगळी केंद्रशासित राज्य अस्तित्वात आली आहेत.
गुरुवारी जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशांच्या नव्या नायब राज्यपालांनी शपथ घेतली आहे. गिरीश चंद्र मुर्मू यांनी जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालपदाची शपथ घेतली. तर आर. के. माथुर यांनी लडाखच्या नायब राज्यपालपदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान, गिरीश चंद्र मुर्मू हे आधी अर्थ मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते. ते 1985 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींचे प्रमुख सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तर आर. के. माथुर हे 1977 बॅचचे आयएएस अधिकारी असून 2018मध्ये ते मुख्य सूचना आयुक्त (CIC) पदावरुन सेवानिवृत्त झाले होते.