नवी दिल्ली : भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) चालू आर्थिक वर्षामध्ये १०.५ टक्क्यांची मोठी घट होण्याचा अंदाज फिच रेटिंग या पतमापन संस्थेने वर्तविला आहे. संस्थेने आपल्या आधीच्या अंदाजापेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण आणखी जास्त होण्याचे संकेत दिले आहेत. याबरोबरच आगामी आर्थिक वर्षात मात्र भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा विकासाच्या मार्गावर लागेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
फिच रेटिंग्ज या पतमापन संस्थेने या आधी जून महिन्यात भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजात अर्थव्यवस्थेची घसरण दर्शविण्यात आली होती. आपल्या आधीच्या अंदाजात बदल करतानाच भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण आणखी ५ टक्के जास्त होण्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनात १०.५ टक्के एवढी प्रचंड घट होण्याची शक्यता संस्थेने वर्तविली आहे. याचाच अर्थ चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था घटणार आहे.
या संस्थेने सन २०२०-२१ या वर्षामध्ये भारताचा अर्थसंकल्पीय तोटा एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या ८.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या आधी हा अंदाज ७.२ टक्क्यांवर होता. चालू आर्थिक वर्षात जगातील सर्वच अर्थव्यवस्थांना कोरोना विषाणूचा मोठा फटका बसला असून, त्यामुळे अर्थव्यवस्था बराच काळ ठप्प झाल्याने आर्थिक विकास खुंटला आहे. त्याचा परिणाम विकासदर हा उणेमध्ये परिवर्तित होण्यात होत आहे.
कोरोना विषाणूमुळे देशात एप्रिल ते जून असे लॉकडाऊन होते. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. या काळामध्ये उत्पादन जवळपास बंद होते. आधीच्या अंदाजापेक्षा उत्पादनामधील घट ही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे, असे विविध पतमापन संस्थांच्या ताज्या अहवालांमधून स्पष्ट होत आहे. परिणामी या संस्थांनी आधी वर्तविलेले उणे वाढीचे अंदाज आता मोठ्या प्रमाणात वाढण्याला प्रारंभ झाला आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीमध्ये लॉकडाऊन उठविल्यानंतर अर्थव्यवस्था बºयापैकी कार्यरत होईल. या काळात अर्थव्यवस्था वाढू लागणार असली तरी तिची गती खूपच कमी राहण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेची आजपर्यंतची सर्वाधिक म्हणजेच २३.९ टक्के घसरण झाली आहे.
चालू आर्थिक वर्षात चलनवाढ ही मुख्यत: पावसाचे प्रमाण, जागतिक कोमोडिटी मार्केट, खनिज तेलाच्या किमती तसेच सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी करण्यात येणाºया योजना यावर अवलंबून राहणार आहे. चलनवाढीत मोठी वाढ संभवते, असे मत आहे. आगामी वर्षाबाबत भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक अंदाज व्यक्त केले आहेत. सन २०२१-२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ११ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
इंडिया रेटिंग अॅण्ड रिसर्च तसेच मॉर्गन स्टॅण्ले या अन्य संस्थांनीही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चालू आर्थिक वर्षात घट होण्याचे अंदाज व्यक्त केले आहेत. इंडिया रेटिंगने भारतीय अर्थव्यवस्थेची घट ११.८ टक्के दराने होण्याची भीती व्यक्त केली आहे. या आधी या संस्थेने भारतीय अर्थव्यवस्था ५.३ टक्के दराने घसरण्याची भीती वर्तविली होती.
मॉर्गन स्टॅण्ले या अन्य संस्थेने आपल्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्था ही ५ टक्के दराने कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. सन २०१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने ४.२ टक्के विकास दर राखला होता. तो आता घट होण्यात बदलणार आहे. पुढील आर्थिक वर्षामध्ये मात्र भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उसळी घेऊन विकासाच्या मार्गावर वाटचाल सुरू करण्याचा अंदाजही या दोन्ही संस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे.