उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये रविवारी भीषण आग लागली होती. ही आग सेक्टर १९ मधील अखिल भारती धर्मसंघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये लागली होती, तिथून ही आग इतर भागात पसरली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे बरेच तंबू आणि त्यातील सामान जळून गेले. आगीचं कारण समजू शकलेलं नाही. यादरम्यान, गीता प्रेसच्या ट्रस्टींनी कुणीतरी बाहेरून ज्वालाग्राही वस्तू फेकली, त्यामुळे ही आग लागली, असा दावा केला आहे.
गीता प्रेसचे ट्रस्टी कृष्ण कुमार खेमकर म्हणाले की, हे शिबीर अखिल भारतीय धर्म संघ आणि गीता प्रेस यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. येथे सुमारे १८० कॅम्प लागलेले होते. आम्ही खूप खबरदारी बाळगत आहोत आणि अग्नी संबंधित कुठल्याही प्रकारचं काम करू नका, अशी सक्त ताकिद देण्यात आलेली आहे.
त्यांनी सांगितले की, पश्चिमेकडे जिथे आम्ही सीमा आखली आहे, त्या बाजूला सर्कुलेटिंग एरिया घोषित करण्यात आला होता. तिथे लोक गंगास्नान करतील. तिकडून कुठलातरी ज्वालाग्राही पदार्थ आमच्या दिशेला आला. तसेच या ठिणगीने हळुहळू मोठ्या आगीचं रूप घेतलं. तसेच त्याच आमचे सर्व कॅम्प जळून खाक झाले. काहीही वाचलं नाही. ईश्वर कृपेने कुठलीही जीवितहानी झाली नाही. कोट्यवधीचा माल जळून खाक झाला.
तसेच सिलेंडरच्या स्फोटाबाबत त्यांनी सांगितले की, आमचं स्वयंपाकघर हे पत्र्याच्या शेडचं होतं. आम्ही पूर्ण खबरदारी घेतली होती. प्राथमिक माहितीनुसार आधी एका सिलेंडरला आग लागली, त्यानंतर ही आग पसरत गेली. आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केलं आणि नंतर वेगवेगळ्या टेंटमध्ये ठेवलेले सिलेंडर एकापाठोपाठ एक फुटत गेले. सुमारे ८ ते ९ सिलेंडर फुटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी खूप कष्टाने या आगीवर नियंत्रण मिळवलं.