'गेहलोत आऊट, दिग्विजय सिंग इन'; मुख्यमंत्रिपदाचा निर्णय सोनिया गांधी घेणार, गेहलोत यांचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 06:14 AM2022-09-30T06:14:45+5:302022-09-30T06:15:13+5:30
राजस्थानातील राजकीय नाट्यानंतर काँग्रेसमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे.
राजस्थानातील राजकीय नाट्यानंतर काँग्रेसमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे आता अध्यक्षपदाचे उमेदवार असतील. आज, शुक्रवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शशी थरूर यांच्याशी त्यांची लढत होईल.
पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरण कार्यालयातून अर्ज घेतल्यानंतर दिग्विजय सिंह म्हणाले, १० अर्ज घेतले आहेत. उद्या अर्ज दाखल करेन. आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहात काय, असे विचारले असता ते म्हणाले, अर्ज परत घेण्याच्या तारखेपर्यंत प्रतीक्षा करा. आपण हे सर्व गांभीर्याने का घेत नाही, असे ते मिश्किलपणे उत्तरले. दिग्विजय सिंह हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, त्यासाठी मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार नवी दिल्लीत दाखल होत आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय सोनिया गांधी घेतील : गेहलोत
- अशोक गेहलोत यांनी गुरुवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. जयपूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ न शकणे आणि संबंधित घटनाक्रमावर आपण सोनिया यांची माफी मागितल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
- आपण आता अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसून आपल्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णयही सोनिया गांधीच घेतील, असे गेहलाेत म्हणाले.
- राजस्थानातील घटनाक्रमामुळे मी मुख्यमंत्री राहू इच्छितो त्यासाठी हे सर्व होत आहे, असा चुकीचा संदेश देशात गेला.
आमची मैत्रीपूर्ण लढत : थरुर
दिग्विजय सिंह यांनी गुरुवारी शशी थरुर यांची भेट घेतली. त्यानंतर दिग्विजय म्हणाले की, मी थरुर यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितले की, आमची लढाई ही मैत्रीपूर्ण आहे. थरुर यांनी ट्वीट करीत म्हटले आहे की, आज दुपारी दिग्विजय सिंह यांची भेट घेतली. त्यांच्या उमेदवारीचे मी स्वागत करतो.
मुख्यमंत्रिपदाबाबत दोन दिवसांत निर्णय
काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी सांगितले की, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी एक-दोन दिवसांत राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील.