गेहलोत-पायलट यांचा वाद पक्ष नेतृत्वाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:39 AM2022-06-28T11:39:48+5:302022-06-28T11:40:30+5:30
प्रियांका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सचिन पायलट यांनी आपल्या समर्थकांना सांगितले आहे की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांच्या विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका.
आदेश रावल -
नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विधानानंतर दुसऱ्या दिवशी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्याशी चर्चा करुन पूर्ण प्रकरणाची माहिती दिली.
प्रियांका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सचिन पायलट यांनी आपल्या समर्थकांना सांगितले आहे की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांच्या विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी सीकर जिल्ह्यात पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, २०२० मध्ये आमचे सरकार पाडण्याच्या कारस्थानात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि सचिन पायलट हे मिळालेले होते.
सूत्रांनी सांगितले की, राजस्थानचे प्रभारी सरचिटणीस अजय माकन यांनीही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना याबाबत पूर्ण माहिती दिली आहे. अशोक गेहलोत समर्थकांनी पायलट गटाविरुद्ध पक्ष नेतृत्वापर्यंत बाजू मांडण्याची योजना आखली आहे. तर, पायलट यांचे निकटवर्तीय दिल्ली येथे जाऊन पक्ष नेतृत्वाकडे आपले म्हणणे मांडू इच्छितात.