जयपूर: सचिन पायलट आणि त्यांच्या काही समर्थक आमदारांच्या कथित बंडाची टांगती तलवार डोक्यावर ठेवून राजस्थानमधील राजकीय अस्थिरता वाढविण्याच्या भाजपाच्या मनसुब्यांना काटशह देण्यासाठी येत्या आठवड्यात राजस्थान विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून सरकारवर विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्याची तयारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चालवली आहे.बहुधा येत्या बुधवारी विधानसभेचे अधिवेशन यासाठी बोलाविले जाईल. मुख्यमंत्री गेहलोत यांनी शनिवारी राज्यपाल कलराज मिश्र यांची घेतलेली भेट याच संदर्भात होती.
काही अपक्ष व अन्य छोट्या पक्षांच्या पाठिंब्याने एकूण २०० पैकी १०७ आमदारांच्या जोरावर गेहलोत सरकार स्थापन झाले होते. परंतु आता उपमुख्यमंत्रीपदावरून काढून टाकलेल्या सचिन पायलट यांनी आपल्यासोबत १८ आमदार असल्याचा व गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला.
पायलट गटाचा कोर्टातील युक्तिवाद दुबळा करणे हाही या रणनीताचा भाग आहे. पक्षांतरबंदी कायदा फक्त विधानसभेत पक्षविरोधी मतदान केले तर लागू होतो. आमदारांच्या दोन बैठकांना गेलो नाही तेवढ्यावरून आम्ही पक्ष सोडला, असे समजून आम्हाला या नोटिसा काढल्या गेल्या, असा पायलट गटाचा न्यायालयात मुद्दा आहे.
च्विधानसभेत विश्वासदर्शक ठराव आणला तर पायलट यांना मतदानासाठी यावे लागेल. ते आले नाहीत तर पक्षांतरबंदी कारवाईचा मार्ग अधिक बळकट होईल. शिवाय त्यांच्यासोबत जे आमदार असतील त्यानुसार बहुमतासाठी लागणारे संख्याबळही तेवढे कमी लागेल.