गेहलोत, कमलनाथांनी नाकारले; ‘त्यांनी’ तेलंगणात करून दाखवले, कोण आहे सुनील कनुगोलू?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 07:44 AM2023-12-05T07:44:35+5:302023-12-05T07:44:58+5:30
रणनीतीकार सुनील कनुगोलू ठरले विजयाचे शिल्पकार
हैदराबाद : तेलंगणामध्ये काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले, ते निवडणूक रणनीतीकार सुनील कनुगोलू. काही महिन्यांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देणाऱ्या कनुगोलू यांची राजस्थान, मध्य प्रदेशमध्येही मदत घेण्याचे काँग्रेस नेतृत्वाने ठरविले. परंतु अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांनी त्यांच्याबाबत असहमती दर्शविली. त्याचाच फटका काँग्रेसला या दोन्ही राज्यांमध्ये बसला.
सुनील कनुगोलू यांनी तेलंगणामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ए. रेवंथ रेड्डी यांच्यासोबत रणनीती आखत प्रचाराचे नियोजन केले. त्यामुळेच १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसची सत्ता उलथवून लावण्यात काॅंग्रेसला यश आले. काँग्रेसने तेलंगणात ११९ पैकी ६४ जागा जिंकत बहुमत सिद्ध केले आहे.
राजस्थानात फटका
निवडणुकीपूर्वी सुनील कनुगोलू यांनी राजस्थानमध्ये संभाव्य उमेदवारांबाबत सादरीकरण केले. परंतु त्यांच्या शिफारशीबाबत अशोक गेहलोत हे असहमत होते. गेहलोत यांनी त्यांच्याऐवजी दुसरे रणनीतीकार नरेश अरोरा यांची मदत घेतली. मात्र निकालानंतर काँग्रेसला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.
भाजपसाठीही केले हाेते काम
२०१८ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी कनुगोलू यांनी भाजपसाठी काम करत त्यांना सत्ता मिळवून दिली होती. तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये त्यांनी भाजपसाठी रणनीती आखली होती.
कर्नाटक पाठोपाठ तेलंगणातही ठरले हिरो
मूळ कर्नाटकमधील असलेले कनुगोलू यांनी गृहराज्यांत काँग्रेससाठी काम करताना भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘पेसीएम’ अभियान सुरू केले. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. कर्नाटकप्रमाणे तेलंगणातही सत्ताधारी बीआरएस सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात जोरदार अभियान चालविले. त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसने तेलंगणात दणदणीत विजय मिळविला.