‘अँटिलिया’बाहेर जिलेटिन; सखोल चौकशी करा, राज्यसभेत कुमार केतकर यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 04:44 AM2021-03-19T04:44:39+5:302021-03-19T04:44:55+5:30
कुमार केतकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात घडलेल्या या गुन्ह्यामुळे सगळ्या देशाला स्तब्ध केले. या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित केली जात नाही. मला एवढेच म्हणायचे की, या प्रकरणात कोणत्या यंत्रणा काम करीत आहेत आणि कोणासाठी व कोणाला लाभ मिळण्यासाठी काम केले जात आहे?’
नितीन अग्रवाल -
नवी दिल्ली : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ उभ्या केलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणाची काँग्रेसचे सदस्य कुमार केतकर यांनी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी गुरुवारी राज्यसभेत केली. शून्य तासात केतकर यांनी विचारले की, जिलेटिनचा पुरवठा करणाऱ्याची चौकशी का केली गेली नाही? जिलेटिनचा पुरवठा कोणाला आणि कोणत्या उद्देशाने केला गेला. पुरवठा करणाऱ्याची पार्श्वभूमीही तपासली पाहिजे.
कुमार केतकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात घडलेल्या या गुन्ह्यामुळे सगळ्या देशाला स्तब्ध केले. या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित केली जात नाही. मला एवढेच म्हणायचे की, या प्रकरणात कोणत्या यंत्रणा काम करीत आहेत आणि कोणासाठी व कोणाला लाभ मिळण्यासाठी काम केले जात आहे?’
काय केला दावा?
केतकर यांनी जिलेटिनचा पुरवठा करणाऱ्याचे नाव घेऊन त्याचा संबंध एका धार्मिक संघटनेशी असल्याचा दावाही केला. त्यावर सभापतींनी आक्षेप घेतला. सभापतींचे म्हणणे होते की, शून्य तासात सभागृहात अशा प्रकारचे आरोप केले जाऊ शकत नाहीत. केतकर यांचे असे काही आरोप सभापतींच्या आदेशाने चर्चेतून काढून टाकले गेले.