लोकसभा निवडणुकीची तयारी, 2000 कोटींचे बजेट; एवढी मोठी रक्कम कुठे खर्च होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 11:24 AM2024-02-15T11:24:25+5:302024-02-15T11:25:29+5:30
General Election 2024 : लोकसभा निवडणुकीत विविध पक्ष प्रचारावर 1500 ते 2000 कोटी रुपये खर्च करू शकतात, असा अंदाज सध्याच्या राजकीय पक्षांच्या तयारीवरून वर्तविण्यात येत आहे.
General Election 2024 : (Marathi News) नवी दिल्ली : देशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या आतापासून हालचाली सुरु झाल्या आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, सत्ताधारी भाजपा सरकार आणि विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. या लोकसभा निवडणुकीत विविध पक्ष प्रचारावर 1500 ते 2000 कोटी रुपये खर्च करू शकतात, असा अंदाज सध्याच्या राजकीय पक्षांच्या तयारीवरून वर्तविण्यात येत आहे.
ईटीच्या रिपोर्टनुसार, यासंबंधी एका ॲडव्हरटायझिंग इंडस्ट्रीच्या एका अधिकाऱ्याने दावा केला आहे. ग्रुप एम साऊथ एशियाचे सीईओ प्रशांत कुमार यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष निवडणूक प्रचारावर 1500 ते 2000 कोटी रुपये खर्च करू शकतात. अशा स्थितीत इंडस्ट्री आणि प्रसिद्धीशी संबंधित लोकांना त्याचा थेट फायदा होणार आहे. तसेच, राजकीय पक्ष निवडणूक प्रचाराच्या बजेटपैकी 55 टक्के डिजिटल मीडिया व जाहिरातींवर आणि 45 टक्के इतर निवडणूक प्रचार यंत्रणेवर खर्च करतील, असे प्रशांत कुमार यांनी सांगितले.
याचबरोबर, यावर्षी सार्वत्रिक निवडणुका, आयपीएल आणि आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमुळे ॲडव्हरटायझिंग इंडस्ट्रीला खूप फायदा होणार आहे. डिजिटल ॲडव्हरटायझिंग, ई-कॉमर्स आणि टीव्ही इंडस्ट्रीला खूप फायदा होईल, असेही प्रशांत कुमार यांनी सांगितले. तर क्रेयॉन्स ॲडव्हर्टायझिंगचे अध्यक्ष कुणाल लालानी म्हणाले, "मला वाटते की 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर खर्च करण्यात येणारी रक्कम 2019 च्या निवडणुकीपेक्षा खूप जास्त असेल."
याशिवाय, भाजपा आणि काँग्रेस पक्ष प्रामुख्याने निवडणूक प्रचारावर जास्त पैसा खर्च करतील, तर प्रादेशिक राजकीय पक्षांचे निवडणुकीचे बजेट फारसे नसेल. निवडणूक प्रचारासंदर्भात राजकीय पक्षांची विविध माध्यमांशी चर्चा सुरू आहे, असे कुणाल लालानी यांनी सांगितले. तर बीसीसीएलचे कार्यकारी संचालक शिवकुमार सुंदरम यांचा अंदाज आहे की, केवळ प्रिंट मीडिया, ज्यामध्ये वर्तमानपत्रे, मासिके इत्यादींचा समावेश आहे, त्यांना राजकीय पक्षांकडून 300 ते 350 कोटी रुपयांच्या जाहिराती मिळतील. ते म्हणाले की, गेल्या वर्षी 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारावर 250 कोटी रुपये खर्च केले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2019 च्या निवडणूक प्रचारावर केवळ 200 कोटी रुपये खर्च झाले होते.