गुजरातेत सामान्य हिंदूही राहुल गांधी यांच्यावर खुश, भाजपा अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 01:34 AM2017-11-29T01:34:54+5:302017-11-29T01:35:18+5:30
आतापर्यंत भाजपाचे नेते काँग्रेसवर सातत्याने अल्पसंख्य अनुनयाचा आरोप करीत आले असल्याने आणि काही वेळा त्याचा फायदा मिळण्याऐवजी तोटा होत असल्याने काँग्रेसने गुजरातच्या निवडणुकीत मुस्लीम कार्ड न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
गांधीनगर/अहमदाबाद : आतापर्यंत भाजपाचे नेते काँग्रेसवर सातत्याने अल्पसंख्य अनुनयाचा आरोप करीत आले असल्याने आणि काही वेळा त्याचा फायदा मिळण्याऐवजी तोटा होत असल्याने काँग्रेसने गुजरातच्या निवडणुकीत मुस्लीम कार्ड न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा पक्षाला मिळू शकेल.
यंदा राहुल गांधी यांनी पटेल, दलित, आदिवासी, ओबीसी यांना आपल्याबरोबर घेण्याचा प्रयत्न केला. विविध मंदिरांना भेटी देऊन, अल्पसंख्य धार्जिणे वा हिंदुंविरोधी अजिबात नाही, असेही त्यांनी दाखवून दिले. त्याचा फायदा पटेल, दलित, आदिवासी, ओबीसी, मच्छिमार यांना सोबत घेण्यात झालाच. शिवाय राहुल गांधी वेगळ्या पद्धतीने राजकारण करू पाहत असल्याची भावना निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजपाविषयी नाराजी असलेले,
पण काँग्रेसकडे संशयाने पाहणारे लोकही आता राहुल गांधींमुळे प्रभावित झाले असल्याचे गुजरातमध्ये जाणवत आहे.
राहुल यांच्या सभांना पटेल, आदिवासी, ओबीसी, दलित यांचीच गर्दी होत नसून, मध्यम व उच्च जातींमधील हिंदुंनाही राहुल यांची भुरळ पडत असल्याचे दिसून आले. भाजपाचे नेते त्यामुळेच अस्वस्थ आहेत. आतापर्यंत भाजपाला मदत करणारेही यंदा राहुल गांधींच्या स्वागताला जातात, मच्छिमारांचे नेते राहुलना भेटून समस्या सांगतात, ही भाजपा नेत्यांसाठी चिंतेची बाब आहे. राहुल गांधी यांचे हे राजकारण भाजपासाठी धक्कादायक ठरले आहे.
काँग्रेसची रणनीती होतेय यशस्वी
भाजपा, रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद यांच्या नेत्यांनी त्यामुळेच राम मंदिराचा मुद्दा आता जोरात लावून धरला आहे. पद्मावती चित्रपटालाही जोरात विरोध केला जात आहे.
पण या विषयांवर बोलायचे नाही, केवळ आणि केवळ गुजरातच्या विकासाबाबत, मोदी सरकारच्या गैरकारभाराबाबतच बोलायचे, अशी काँग्रेसची रणनीती आहे. ती सध्या तरी यशस्वी होताना दिसत आहे.
गुजरातमधील साडेनऊ टक्के मुस्लीम मतदार भाजपाला मते देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. काँग्रेसच्या किमान एका नेत्याने तरी मुस्लीम अनुनयाची भाषा करावी, मुस्लिमांवरील अन्याय असे बोलावे, अशी भाजपाची मनोमन इच्छा आहे. पण त्यात अडकायला काँग्रेस तयार नाही.
मुस्लीम मते भाजपाला नव्हे, तर आपल्यालाच मिळतील, हे काँग्रेस जाणून आहे. त्यासाठी मुल्ला-मौलवी यांच्यासह फोटो काढून घेण्याची आम्हाला गरज नाही, असे एका काँग्रेस नेत्याने बोलून दाखवले.
मणिनगरमधून हा नवा चेहरा
गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत एका नव्या चेहºयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो चेहरा एखाद्या मॉडेलचा असावा, असे अनेकांना वाटते. पण तो चेहरा आहे काँग्रेसच्या मणीनगरमधील उमेदवार श्वेता ब्रह्मभट्ट यांचा. उच्चशिक्षित असलेल्या श्वेता यांनी महिला आणि तरुण यांना सक्षम करण्याला माझे पहिले प्राधान्य असेल, असे जाहीर केले आहे. त्यांची मते आपणास नक्की मिळतील, असा विश्वास त्या व्यक्त करतात.
इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांच्याविरोधात भाजपाचे सुरेश पटेल आहेत. श्वेताचे वडिल नरेंद्र ब्रम्हभट्टही काँग्रेसमध्ये सक्रीय असून त्यांनी २000 साली काँग्रेसतर्फे निवडणूक लढवली होती. श्वेता यांना कॉपोर्रेट क्षेत्रात काम करायचे होते. बीबीएमध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी लंडनच्या विद्यापीठातून मास्टर्सची पदवी घेतली. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून काम केले. त्यानंतर समाजकारण आणि कॉपोर्रेट क्षेत्र असे दोन पर्याय समोर होते. आपण समाजकारणाची निवड केली, असे त्या म्हणतात.
म्हणून मी काँग्रेस पक्ष निवडला
मणीनगर हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. पण माझ्या मतदारसंघातील ७५ टक्के मतदार तरुण तसेच महिला आहेत. त्यांचा पाठिंबा मला मिळेल. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विचारधारा आणि लोकशाही या आधारावर मी काँग्रेसची निवड केली. - श्वेता ब्रह्मभट्ट