Ram Mandir Ayodhya: अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. जगभरातून रामलला दर्शनासाठी भाविक येणार आहेत. तत्पूर्वी २२ जानेवारी २०२४ रोजी हजारो भाविक, मान्यवारांच्या उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांची रीघ राम मंदिरात लागणार आहे. यासाठी श्रीरामजन्मभूमी ट्रस्टकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, विशेष योजना तयार करण्यात आली आहे. यानुसार एकावेळेस १० ते १५ हजार भाविक राम मंदिर परिसरात आश्रय घेऊ शकतील, असे सांगितले जात आहे.
१५ डिसेंबरपर्यंत रामललाची मूर्ती घडवून पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. तसेच राम मंदिराच्या दर्शनाबाबत सोशल मीडियावर सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. राम मंदिराला भेट देण्याची इच्छा असणाऱ्या भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी कोणत्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे, यासंदर्भात श्रीरामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी माहिती दिली आहे.
विहिंप आणि आरएसएसचे अनुभवी कार्यकर्ते लागलेत कामाला
श्रीरामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, जर १० ते १५ हजार लोकांना रात्री मुक्काम करायचा असेल तर त्यांना निवारा कुठे मिळेल? त्यांना अन्न-पाणी कोठून मिळणार? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. यासाठी ट्रस्ट नवीन टीनशेड सिटी उभारत आहे. हे काम फेब्रुवारीच्या अखेरीस तयार होईल. या कामासाठी देशभरातून विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुभवी कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात येत आहे. प्रत्येकजण आपापले कर्तव्य बजावत आहे, असे चंपत राय यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यासह देशभरातील ४ हजारपेक्षा जास्त संत-महंतांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहे. २२ जानेवारी पूर्वी अयोध्येत यावे, असेही सांगितले गेले आहे. जेणेकरून गैरसोय होणार नाही. देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.