Lok Sabha Election 2024 । नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे. अलीकडेच २३ जून रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांसह अनेक नेते उपस्थित होते. पण, आम आदमी पार्टीने जाहीर केलेल्या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये फूट पडल्याचे दिसते.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीतील लोकसभेच्या सर्व सात जागा लढणार असल्याचे जाहीर केले आहे. 'आप'चे महासचिव संदीप पाठक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, निवडणूक प्रचारादरम्यान आम्ही आमचा मुद्दा लोकांसमोर ठेवणार असून केंद्राचा अध्यादेश तुमच्या विरोधात असल्याचे सांगणार आहोत.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 'आप'चे नेते संदीप पाठक यांनी दिल्ली आणि हरयाणाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, भाजपच्या विरोधात विरोधकांनी एक होण्याची गरज आहे, परंतु ते काँग्रेसच्या धोरणांवरून दिसत नाही. खरं तर पाटणा येथील विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर 'आप'ने एक निवेदन जारी केले होते. "जर काँग्रेसने दिल्ली अध्यादेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही, तर आम्ही कोणत्याही बैठकीत सहभागी होणार नाही, ज्यामध्ये काँग्रेसचा सहभाग असेल", असे 'आप'ने म्हटले होते.