ठळक मुद्देमाजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी नवी दिल्लीतल्या मॅक्स केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते.
नवी दिल्ली- माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी नवी दिल्लीतल्या मॅक्स केअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना अल्झायमर नावाचा दुर्धर आजार झाल्यानं दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही फर्नांडिस यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं आहे.जॉर्ज साहेबांनी भारताच्या सर्वोत्तम राजकीय नेतृत्वाचे प्रतिनिधित्व केले. सरळ आणि दूरदृष्टीने त्यांनी देशात योगदान दिलं आहे. गरीब आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी ते सर्वात प्रभावी आवाज होते. त्याच्या निधनानं अतीव दुःख झालं आहे.जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मात्र 1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कामगार संपाचे त्यांनी नेतृत्व केले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्रिपद भूषवले.जुलै 1979 मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले, पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास नसल्याचं सांगत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 1989मध्ये त्यांनी बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटवर लोकसभा निवडणूक जिंकली. विश्वनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त आघाडीच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री राहिले आहेत. बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांना एकत्र करत समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.1996च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय मिळवला होता. पुढे 1998 आणि 1999च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नालंदा मतदारसंघातूनच विजय मिळवला. 1999च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल (संयुक्त) हा नवा पक्ष अस्तित्वात आला. 1998मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम बघितले.