मुंबई : कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी नवी दिल्लीतल्या मॅक्स केअर रुग्णालयात मंगळवारी अखेरचा श्वास घेतला.
जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे संयोजक असताना त्यांनी उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरुन 2008 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांची चांगलीच कान उघाडणी केली होती. मुंबईतील उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे यांनी अभियान सुरु केले होते. त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीयांना मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. याप्रकरणी राज ठाकरेंना पत्र लिहिले आणि ज्या उत्तर भारतीयांना महाराष्ट्रातून बाहेर जाण्यास भाग पाडले. तसेच, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा हल्ला करणाऱ्या गुंडांना त्यांची माफी मागायला लावा, असे जॉर्ज फर्नांडिस यांनी सांगितले होते. याशिवाय, उत्तर भारतातून विशेषता बिहार आणि उत्तर प्रदेशामधून आलेल्या मुंबईतील टॅक्सीचालकांवरील हल्ल्याप्रकरणी त्यांनी राज ठाकरेंना जाब विचारला होता.
दरम्यान, जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मात्र 1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी नेतृत्व केले.
आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्रिपद भूषवले. जुलै 1979 मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले, पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास नसल्याचं सांगत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.