शपथविधी सोहळा पाहायला आले अन् मंत्री झाले; जॉर्ज कुरियन यांची अशी लागली लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 05:24 PM2024-06-11T17:24:48+5:302024-06-11T17:26:45+5:30
केरळमधून भाजपचे मोठे नेते असणाऱ्या जॉर्ज कुरियन यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
George Kurien : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपले सरकार स्थापन केले आहे. एनडीएचे संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींसोबत ७१ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये ३० कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळात काही असे मंत्री आहेत जे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य देखील नाहीत. त्यातील एक नाव आहे जॉर्ज कुरियन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात एकही मुस्लिम चेहरा नाही. मात्र यामध्ये पाच अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना स्थान देण्यात आलं आहे. यामध्येच जॉर्ज कुरिअन हे देखील आहेत. जॉर्ज कुरिअन यांना अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयात राज्यमंत्री करण्यात आलं आहे. यासोबत मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री पदही जॉर्ज कुरिअन यांना सोपवण्यात आलं आहे. मात्र जॉर्ज कुरियन यांच्या मंत्री होण्याचा किस्सा फारच रंजक आहे.
लोकसभा किंवा राज्यसभेचे सदस्य नसलेल्या जॉर्ज कुरियन यांच्यावर अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. कुरियन हे मूळचे केरळचे असून ख्रिश्चन समाजाचे आहेत. त्यांना मंत्रीपद देण्यामागे केरळमधील ख्रिश्चनांना आकर्षित करण्याची भाजपची रणनीती असल्याचे म्हटलं जात आहे. केरळमध्ये हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही समुदायांची लोकसंख्या चांगली आहे. भाजपचे सरचिटणीस असलेले जॉर्ज कुरियन यांचे नाव पक्षात मोठे आहे आणि त्यांनी केरळसारख्या राज्यात पक्षासाठी खूप काम केले आहे.
कसे मिळाले मंत्रिपद?
मात्र जॉर्ज कुरियन यांना ज्या पद्धतीने मंत्रिपद देण्यात आले, त्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. जॉर्ज कुरियन यांना ते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं कळल्यावरही आश्चर्यचकित झाले होते. जॉर्ज कुरियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी ते शनिवारी संध्याकाळी दिल्लीत आले होते. मात्र रविवारी सकाळी ते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे कळताच कुरियन यांना आश्चर्याचा धक्का बसला. लोकसभेचे किंवा राज्यसभेचे खासदार नसतानाही हे कसे झाले याची त्यांनाही कल्पना नव्हती.
जॉर्ज कुरियन यांना मंत्रिपद का?
केरळमध्ये ख्रिश्चन समाजातील अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. भाजपशी एकनिष्ठ असल्यामुळे कुरियन यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेशी त्यांचा संबंध आहे. जॉर्ज कुरियन हे गेल्या चार दशकांपासून भाजप संघटना मजबूत करण्याचे काम करत आहेत. त्यांनी पक्षात अनेक पदे भूषवली. त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यत्व, युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करणे आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष अशा पदांवर काम केले. पंतप्रधान मोदींच्या केरळ दौऱ्यात त्यांनी अनुवादक म्हणूनही काम केले होते.