बंगळुरू - भारताच्या जर्मन दुतावासाने रविवारी डिजिटल पेमेंटद्वारे भारतीय बाजारात भाजी खरेदी करत डिजिटल इंडियाचं कौतुक केलंय. देशाच्या विकासात डिजिटल पेमेंट यंत्रणेला एक महत्त्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे फेडरल डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग यांनी UPI चा वापर करुन भारतात भाजी खरेदी केली. त्यांचा भाजी खरेदी करतानाचा व्हिडिओ व्हायरल समोर आला आहे.
"भारताची एक यशोगाथा म्हणजे डिजिटल पायाभूत सुविधा. UPI प्रत्येकाला काही सेकंदात व्यवहार करण्यास सक्षम करते. लाखो भारतीय त्याचा वापर करतात. फेडरल डिजिटल आणि वाहतूक मंत्री वोल्कर विसिंग यांनीही देशातील UPI पेमेंटचा सहजपणे अनुभवू घेतला. या व्यवहाराने ते खूप प्रभावित झाले", असे ट्विट जर्मन दुतावासाने केले आहे. त्यामुळे, भारतातील डिजिटल इंडियाच्या कार्यपद्धतीचा गवगवा जर्मनीतही पोहोचला आहे.
विसिंग यांनी १९ ऑगस्ट रोजी बंगळुरू येथे जी२० च्या डिजिटल मंत्रीपरिषदेत सहभाग घेतला होता. १८ ऑगस्ट रोजी ते बंगळुरूत पोहोचले होते. येथील बैठकीत डिजिटल इंडियावर मंथन झालं असून केंद्रीयमंत्री अश्विण वैष्णव यांनी आयटी आणि एआय क्षेत्रातील भारत आणि जर्मनीच्या संबंधातील व्यवहारिक बाबींवर चर्चा केली. दरम्यान, यूनिफाइड पेमेंट्स इंटरफ़ेस म्हणजेच UPI या डिजिटल व्यवहार प्रणालीमुळे भारतातील आर्थिक देवाण-घेवाण गतीमान झाली आहे. विशेष म्हणजे २४ तास ही सेवा सुरू असल्याने सर्वांनाच याचा फायदा झाला आहे.