इस्लामाबाद - पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्याहस्ते कतारपूर कॉरिडोरचे भूमीपूजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना, इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाबाबत सकारात्मक विधान केलं आहे. भारत पाकिस्तानमध्ये फक्त काश्मीर मुद्द्यावरुन भांडण सुरू आहे. दोन्ही सरकारने एकत्र येऊन चर्चा केल्यास हाही प्रश्न मार्गी लागेल. जर जर्मनी आणि फ्रान्स एकत्र येऊ शकतात, तर भारत-पाकिस्तान का नाही ? असे म्हणत खान यांनी भारताकडे मित्रत्वाच्या नात्यानं पाहिलं आहे. तसेच यापुढे भारत आणि पाकिस्तान लढाई होणार नाही. करतारपूर कॉरिडोर खुली करणे म्हणजे मदीनाची सीमरेषा खुली करण्यासारखं आहे,असे इम्रान खान यांनी म्हटलं.
पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा नानक शाहपासून करतारपूरपर्यंत कॉरिडॉर बांधण्याची मागणी शीख समुदायाकडून बऱ्याच कालावधीपासून होत होती. याबाबत, भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे पाकिस्तान सरकारनेही भारताच्या या भूमिकेचं स्वागत केलं. त्यामुळेच आज पाकिस्तानच्या कतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला भारताच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानकशी जोडण्यात येणारे पहिले पाऊल पडले. पाकिस्तानमध्ये कतारपूर साहिब हे प्रार्थनास्थळ रावी नदीपलिकडील डेरा बाबा नानक यांच्यापासून केवळ 4 किमी अंतरावर आहे. शिख गुरूंनी 1522 मध्ये या गुरूद्वाराची स्थापना केली होती. पहिला गुरुद्वारा, गुरुद्वारा कतारपूर साहिब येथे उभारण्यात आला होता. येथेच गुरू नानक यांनीही आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण व्यतीत केले होते.
या कार्यक्रमात बोलताना हिंदू जीवे, पाकिस्तान जीवे अशी घोषणा भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी केली. मला अजिबात भिती नाही, मेरा यार इम्रान जीवे. सर्वांनी आपली विचार करण्याची पद्धत बदलायला हवी. तरच शांती प्रस्थापित होईल, आता मारा-मारी, रक्तसंग्राम बंद व्हायला हवा. तरच, मैत्रीचा धागा विनला जाईल, असेही सिद्धू यांनी म्हटले. दरम्यान, या कार्यक्रमाला केंद्रीयमंत्री हरसिमरत कौर बादल याही उपस्थित होत्या. आज शीख धर्मीयांसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगताना कौर अतिशय भावूक झाल्या होत्या.