नवी दिल्ली : नव्या कायद्यानुसार महिला कर्मचाऱ्यांना आता २६ आठवड्यांची पगारी मातृत्व रजा मिळणार आहे. यापूर्वी ही रजा १२ आठवड्यांची होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मातृत्व लाभ (सुधारणा) कायदा, २०१७ वर मंजुरीची मोहोर उमटवली. या कायद्याद्वारे महिला कर्मचाऱ्यांना विविध लाभ मिळवून देणाऱ्या ५५ वर्षांपूर्वीच्या कायद्याच्या तरतुदीत काही बदल करण्यात आले आहेत. नव्या कायद्याने ५० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांना विहित अंतरात बाल संगोपन केंद्राची सुविधा उभारणे तसेच महिलेला या केंद्राला दिवसातून चार भेटी देण्याची मोकळीक देणे बंधनकारक आहे. प्रत्येक आस्थापनेने महिला कर्मचाऱ्यांना नव्या कायद्याद्वारे त्यांना मिळणारे लाभ कळविले पाहिजेत, असेही या कायद्यात नमूद आहे. तीन वर्षांखालील वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या तसेच आपला गर्भ दुसऱ्या महिलेच्या पोटी वाढविणाऱ्या महिलेलाही १२ आठवड्यांची मातृत्व रजा उपभोगता येईल. नव्या कायद्यानुसार, २६ आठवड्यांची पगारी मातृत्व रजा पहिल्या दोन अपत्यांसाठीच आहे.
२६ आठवड्यांची पगारी मातृत्व रजा मिळणार
By admin | Published: March 30, 2017 1:48 AM