- ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 31 - कॉलेजमध्ये 75 टक्क्यांहून जास्त हजेरी लावणा-या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून चक्क स्मार्टफोन भेट म्हणून देण्यात आले. उच्च शिक्षण मंत्री जयभान सिंग पवैय्या यांनी 11 सरकारी कॉलेजमधील 55 विद्यार्थ्यांना हे स्मार्टफोन भेट म्हणून दिले. मेहनती विद्यार्थ्यांना स्मार्टफोन भेट म्हणून देण्यात येतील अशी घोषणा भाजपा सरकारने 2013 विधानसभा निवडणुकीत केली होती. त्याप्रमाणे हे स्मार्टफोन भेट म्हणून देण्यात आले.
जानेवारी महिन्यात सरकारने एप्रिलपर्यंत हे मोबाईल फोन वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने सर्व कॉलेजना पत्र पाठवून 28 जानेवारीपर्यंत पात्र विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यास सांगितलं होतं.
'जागतिकीकरणाच्या या जगात विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असणं खुप गरजेचं आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हे स्मार्टफोन विद्यार्थ्यांना दिले आहेत', असं जयभान सिंग पवैय्या बोलले आहेत.