पुन्हा परदेश दौऱ्यावर जाल तेव्हा 'दुसऱ्या' मोदीला आणा- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 09:28 AM2018-02-21T09:28:23+5:302018-02-21T09:28:34+5:30
राहुल यांनी नरेंद्र मोदी आणि नीरव मोदी यांची तुलनाही केली.
मेघालय: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा परदेश दौऱ्यांवर जात असतात. यावेळी परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी येताना जनतेचा पैसा लुटून परदेशात पळालेल्या 'दुसऱ्या' मोदीला (नीरव) परत घेऊन यावे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला. राहुल गांधी मंगळवारी मेघालय येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राहुल यांनी पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्यावरून मोदींना चिमटे काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बऱ्याचदा परदेश दौऱ्यांवर जात असतात. त्यामुळे मी देशातील जनेतच्यावतीने त्यांना एक विनंती करतो की, यापुढे जेव्हा परदेश दौऱ्यावर जाल तेव्हा, येताना 'दुसऱ्या' मोदीला परत घेऊन यावे. जेणेकरून देशातील लोकांना त्यांचे कष्टाने कमवलेले पैसे परत मिळतील.
यावेळी राहुल यांनी नरेंद्र मोदी आणि नीरव मोदी यांची तुलनाही केली. 'नीरव मोदी हिरे विकतो. हिऱ्यांना आपण स्वप्नातील वस्तू म्हणतो. खरे तर त्याने अनेक लोकांची स्वप्ने विकली आहेत. त्यात सरकारही सहभागी आहे. तो जनतेची कमाई लुटून पसार झाला त्यावेळी सरकार शांत झोपले होते. काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय जनतेला स्वप्ने विकली होती. त्यात 'अच्छे दिन'चे स्वप्न होते. सर्वांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्यांसह अनेक स्वप्नांचा त्यात समावेश होता, असे राहुल यांनी सांगितले.
दरम्यान, नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याविषयी असमर्थता दर्शविली आहे. सर्व देणी चुकती करण्याची मी ‘आॅफर’ दिली असताना, तुम्ही महाघोटाळ्याची विनाकारण आवई उठवून झटपट वसुलीची कारवाई सुरू केलीत. परिणामी, धंदा बंद झाल्याने माझ्याकडून वसुली करण्याच्या तुमच्या क्षमतेवर मर्यादा आल्या आहेत. तुम्हीच तुमच्या कृतीने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला, असे त्याने पीएनबीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.