नवी दिल्ली : सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’ जाहीर केली. या योजनेचे उद्दिष्ट १ कोटी घरांना दर महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरविणे आहे.
सामाजिक माध्यम एक्सवर एका पोस्टमध्ये पीएम मोदी म्हणाले, पुढील शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी, आम्ही ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजना’ सुरू करत आहोत. ७५,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा हा प्रकल्प, दर महिन्याला ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देऊन, १ कोटी कुटुंबांना प्रकाश देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सरकारने एक संकेतस्थळही तयार केले आहे.
नेमकी योजना काय?या योजनेद्वारे लोकांच्या बँक खात्यात थेट दिल्या जाणाऱ्या भरीव सबसिडीपासून ते मोठ्या प्रमाणात सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, केंद्र सरकार लोकांवर खर्चाचा बोजा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल. देशभरात रूफटॉप सोलर सिस्टीमला अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेमुळे अधिक उत्पन्न, कमी वीज बिल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल.