नवी दिल्ली - आधार कार्ड धारकांची वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सरकारकडून वारंवार सांगितले जाते. मात्र फक्त 500 रुपयांत कोणाच्याही आधार कार्डची माहिती मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंग्रजी वृत्तपत्र द ट्रिब्यूननं याबाबतचा दावा केला आहे. द ट्रिब्यूनच्या एका पत्रकारानं 500 रुपयांमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून व्हाट्सअॅपवरुन एक असा सॉफ्टवेअर घेतला आहे. त्याद्वारे लाखो लोकांच्या आधार कार्डची माहिती त्यातून मिळू शकते. यामुळे आधार कार्डमधील माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. UIDAI नं मात्र हा आरोप फेटाळला आहे.
रिपोर्टमध्ये आसा दावा करण्यात आला आहे की, फक्त 500 रुपयात भारतातील सर्वच आधारकार्ड धारकांची माहिती मिळू शकते. द ट्रिब्यूनच्या त्या पत्रकारानं सॉफ्टवेअर तयार करणाऱ्याला एका एजंटद्वारे संपर्क केला. त्याला पेटीएमद्वारे पैसे पाठवले. त्यानंतर 10 मिनीटात लगेच एका व्यक्तीनं एक लॉगइन आईडी आणि पासवर्ड दिला. त्याद्वारे पोर्टलवर कोणत्याही आधारकार्डची माहिती मिळू शकते. यामध्ये नाव, पत्ता, पिन कोड, फोन क्रमांक आणि मेल आयडीचा समावेश आहे.
यूआयडीएआयकडून जारी करण्यात येणाऱ्या आधारकार्डवर देशातील प्रत्येक नागरिकाला 12 अंकांचा एका ओळख क्रमांक दिला जातो. जी त्या नागरिकाची ओळख आणि पत्त्यासाठी पुरावा मानला जातो.
गेल्या सहा महिन्यांपासून व्हॉटस अप या मेसेजिंग अॅपवर हा ग्रुप कार्यरत असून अनेकांनी याद्वारे आधार कार्डधारकरांची माहिती चोरली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी युआयडीएआयचे रिजनल अॅडिशनल डायरेक्टर जनरल संजय जिंदल यांच्याकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. हा सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात मोठा धोका असून लवकरच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे जिंदल म्हणाले.