अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 06:32 AM2024-05-09T06:32:04+5:302024-05-09T06:32:25+5:30
Rahul Gandhi vs Narendra Modi: पाच वर्षांपासून उपस्थित करत असलेल्या अंबानी-अदानी या मुद्यावर काँग्रेसच्या शहजाद्याने बोलायचे बंद केले आहे. यामागचे कारण काँग्रेसने जनतेला सांगितले पाहिजे. शहजाद्याने हा मुद्दा उपस्थित न करण्यासाठी काही ‘डील’ केले नाही ना? असे मोदी म्हणाले होते.
- हरिश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
हैदराबाद : पाच वर्षांपासून उपस्थित करत असलेल्या अंबानी-अदानी या मुद्यावर काँग्रेसच्या शहजाद्याने बोलायचे बंद केले आहे. यामागचे कारण काँग्रेसने जनतेला सांगितले पाहिजे. शहजाद्याने हा मुद्दा उपस्थित न करण्यासाठी काही ‘डील’ केले नाही ना? असा प्रश्नही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विचारला.
तेलंगणा येथील वेमुलावाडा येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते म्हणाले की, अदानी-अंबानी यांच्याविरोधात करण्यात येणारा प्रचार काँग्रेसकडे नोटांनी भरलेला टेम्पो पोहोचल्यामुळे त्या पक्षाने बंद केला की काय? निवडणुका जाहीर झाल्यापासून अंबानी-अदानी यांच्यावर टीका करणे काँग्रेसने थांबवले आहे. अदानी-अंबानींकडून नेमके काय मिळाले हे काँग्रेसच्या शहजाद्याने तेलंगणाच्या भूमीवरून जाहीर करावे, असे आव्हानही पंतप्रधानांनी दिले. याला राहुल गांधी यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेस पक्षाने अदानी-अंबानी यांच्यावर टीका केली होती आणि आता एका रात्रीत ही टीका थांबली. याचा अर्थ काँग्रेस पक्षाला बहुतेक काही टेम्पो भरून ‘चोरी का माल’ मिळाला आहे. काले धन की कितनी बाेरीया भरकर रुपये मारे है असा सवालही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केला.
‘काँग्रेस, बीआरएसचे घराणेशाहीला प्राधान्य’
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, काँग्रेस, भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हे दोन पक्ष घराणेशाहीला महत्त्व देतात. हे दोन पक्ष भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून परस्परांवर टीका करतात. पण दोन्ही पक्षच भ्रष्टाचारी आहेत.
‘काँग्रेस, इंडिया आघाडीचा तिसरा फ्यूजही उडाला’
nलोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यानंतर झालेल्या या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील मतदानाने काँग्रेस व इंडिया आघाडीचा तिसरा फ्यूजही उडाला आहे.
nआता या निवडणुकांचे चार टप्पे शिल्लक असून, त्यामध्ये जनतेचे आशीर्वाद भाजपप्रणित एनडीए आघाडीला मिळणार आहेत. आमचा विजय निश्चित आहे.
आम्हाला पैसे दिले का, सीबीआय, ईडी चौकशी करा
नवी दिल्ली : अदानी, अंबानी यांनी काँग्रेसला टेम्पो भरून पैसे पाठविले असावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे असेल तर त्यांनी सीबीआय, ईडीमार्फत चौकशी करावी, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिले.
राहुल गांधी म्हणाले, उद्योगपती पैसे पाठवितात या वैयक्तिक अनुभवावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले असावे. मोदी यांनी या दोन उद्योगपतींना जे पैसे दिले आहेत, ती रक्कम आम्ही जनतेला योजनांच्या माध्यमातून परत देणार आहोत. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचे चालक व सहाय्यक कोण आहेत याची देशाला माहिती आहे. यावेळी प्रथमच तुम्ही जाहीरपणे दोघांबद्दल बोलला. हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? असा सवालही राहुल यांनी केला.