संघ विचारधारेशी संघर्षास बाहेर पडा -राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:44 AM2021-03-09T05:44:58+5:302021-03-09T05:45:21+5:30
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन
शीलेश शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा देशाला कमकुुवत करीत असल्यामुळे काँग्रेसच्या आघाडीवरील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्या विचारधारेशी संघर्ष करण्यासाठी बाहेर पडावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केले. पक्षाच्या फ्रंटल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते येथे बोलत होते.
संवैधानिक संस्थांमध्ये आपले लोक बसवून असे जाळे विणले जात आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले की, पक्षाच्या युवक संघटनांना जनतेत जाऊन हे सांगावे लागेल म्हणजे ते सावध होतील. गांधी यांनी भाषणात ज्योतिरादित्य शिंदे यांचाही उल्लेख केला की, जर ते काँग्रेसमध्ये राहिले असते तर मुख्यमंत्री बनले असते. भाजपमध्ये ते आज मागच्या बाकावर (बॅक बेंचर) बसून आहेत. भाजप त्यांना कधी मुख्यमंत्री पद देणार नाही.
शिंदे यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या भाष्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी ‘लोकमत’ शी बोलताना खंडन केले. ते म्हणाले की, फ्रंटल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राहुल गांधी यांनी शिंदे यांच्याबद्दल भाष्य तर दूर त्यांचे नावही घेतले नाही. पूर्ण चर्चेचा व्हिडिओ उपलब्ध असून तो सार्वजनिक केला जाऊ शकतो.