- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : अल्पावधीत सूचना मिळताच सज्ज राहा, असे स्पष्ट निर्देश भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वायुदलाच्या सर्व अधिकारी आणि जवानांना दिले आहेत. सीमेपलीकडून सातत्याने काश्मीर खोऱ्यातील भारतीय लष्करी तळांवर होत असलेले दहशतवादी हल्ले, नियंत्रण रेषेवरील गोळीबार आणि पाकिस्तानने छेडलेल्या छुप्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही धोक्याचा कणखरपणे मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी वैयक्तिक पत्राद्वारे १२ हजार अधिकारी व जवानांना केले आहे.सद्य:स्थितीत पारंंपरिक धोका आहे, तेव्हा अल्पावधीत सूचना मिळताच आहे त्या सामर्थ्यानिशी सज्ज राहणे जरूरी आहे. त्यासाठी ट्रेनिंगवर भर देणे गरजेचे आहे, असे वायुदल प्रमुखांनी या पत्रात म्हटले आहे.नवीन तंत्रज्ञानाची कास धरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. सोबतच शत्रूपेक्षाही याबाबतीत पुढे राहायचे आहे. तेव्हा युद्धाच्या स्थितीत आपण सर्वांपेक्षा वेगळे आणि जिंकण्याच्या स्थितीत असू, असेही त्यांनी नमूद केले आहे. वायुदलाच्या सामर्थ्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. वायुदलाकडे आजही लढाऊ पथकाचा मोठा अभाव आहे. सद्य:स्थितीत अशा ४२ लढाऊ पथकांची गरज आहे. तथापि, आपल्याकडे अशी ३३ पथके आहेत. १२ हजार अधिकाऱ्यांना ३० मार्च रोजी लिहिलेल्या या पत्रात त्यांनी पक्षपात आणि लैंगिक अत्याचाराचाही उल्लेख केला आहे. वायुदलप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तीन महिन्यांनी त्यांनी हे वैयक्तिक पत्र लिहिले आहे.महत्त्वाच्या पदांवर नियुक्तीसाठी, तसेच बढतीसाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यात पक्षपात, मेहरबानी करण्याचे काही प्रकार घडले आहेत. असल्या वशिलेबाजीने समस्या निर्माण होऊ शकते. उद्धट वागणूक आणि दमदाटीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांसाठी करार केला आहे. - वायुदलप्रमुखांनी सर्व अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच सज्ज राहण्यासंबंधी वैयक्तिक पत्र लिहिले आहे. यापूर्वी १ मे १९५० रोजी तत्कालीन लष्करप्रमुख करिअप्पा आणि १ फेब्रुवारी १९८६ रोजी के. सुंदरजी यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते.- दहशतवादी संघटनांना हातीशी धरून आणि त्यांना आर्थिक पाठबळ देऊन पाकिस्तानी गुप्तचर संस्था सातत्याने भारताविरुद्ध छुपे युद्ध छेडत आल्या आहेत. - पाकिस्तानच्या सततच्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारत लष्करी सामर्थ्य वाढविण्यावर भर देत आहे. त्यानुसार भारत अमेरिकेकडून १९ लढाऊ विमाने खरेदी करणार आहे.