नवी दिल्ली - केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची घोषणा केली. त्यानुसार, वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. त्यांना अग्निवीर संबोधण्यात येईल. त्यांना चार वर्षे लष्करात सेवा करता येणार आहे. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून पुढील 7 महिन्यात 40 हजार जवानांची सैन्यात भरती होणार आहे. त्यासाठी, देशातील 773 जिल्ह्यात हे अभियान चालणार आहे. नौदल आणि वायू दलाने अनुक्रमे एका वर्षात 3 हजार आणि 3.5 हजार जवानांची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सुरक्षा विषयाच्या मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नौदलाचे प्रमुख एडमिरल आर. हरीकुमार म्हणाले की, या योजनेमुळे सशस्त्र दलाची ताकद वाढेल. या योजनेची घोषणा तिन्ही दलांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. संपूर्ण देशात ही भरती आयोजित करण्यात येणार आहे. तर, उपप्रमुख बीएस. राजू यांनी सांगितले की, 180 दिवसांत 25,000 जवानांची भरती होणार आहे. त्यानंतर, पुढील महिन्यात 15000 अग्निवीरांचा भरती होईल.
अग्निवीरांसाठी पदवीचा कोर्स
अग्निवीरांसाठी शिक्षण मंत्रालयातर्फे तीन वर्षीय कौशल्य विकास आधारित पदवीधर पदवीला मान्यता देणार आहे. सैन्य दलातील नोकरीसाठी अग्निवीरांना संधी मिळावी, हाही यामागचा उद्देश आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामार्फत या पदवीचा अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. तसेच, येथूनच अग्निवीर विद्यार्थ्यांना पदवी घेता येणार आहे.
काय आहेत 'अग्निपथ'ची वैशिष्ट्ये?
४६,००० सैनिकांची यावर्षी तीनही दलात भरती४४ लाख रुपये सेवेत असताना विकलांग झाल्यास देणार, याशिवाय शिल्लक नोकरीचे वेतनही दिले जाईल.११.७१ लाख रुपये प्रत्येक अग्निवीराला मिळणार२५% अग्निविरांना मेरिटच्या आधारावर नियमित कॅडरमध्ये समाविष्ट करणार
वेतन किती? पहिले वर्ष >> ₹३०,०००दुसरे वर्ष >> ₹३३,०००तिसरे वर्ष >> ₹३६,५००चौथे वर्ष >> ₹४०,०००
कुणाला मिळू शकेल लाभ?१७.५ ते २१ वर्षांचे तरुण पहिली भरती रॅली ९० दिवसात, दहावी, बारावी उत्तीर्ण आवश्यक
सैन्यदलात दहा वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशननुसार तरुणांची भरती करण्यात येते. हा काळ १४ वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. वेतन व पेन्शन खर्च घटवण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे.
भरतीला तरुणांचा विरोध
बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये केंद्राच्या या योजनेविरोधात वातावरण तापले आहे. या योजनेविरोधात संतप्त झालेल्या तरुणांनी बिहारच्या बक्सरमध्ये ट्रेनवर दगडफेक केली आहे. तर मुजफ्फरपुरमध्ये देखील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी या उमेदवारांनी चक्काजाम केले आहे. मोठ्या संख्येने सकाळी ९ वाजता तरुण बक्सर रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते, तिथे त्यांनी रेल्वे ट्रँकवर उतरून गोंधळ घातला. यानंतर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत ते रुळांवरच बसले. यामुळे जन शताब्दी एक्सप्रेस तासाभरासाठी रोखून ठेवण्यात आली होती. यावेळी पाटन्याला जात असलेल्या पाटलिपूत्र एक्स्प्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली. आरपीएफने रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र, तरी देखील उमेदवार तिथून हटण्याचे नाव घेत नाहीएत.