आगरतळा, दि. 18 - त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना जीवे मारण्याची धमकी फेसबुक पोस्टद्वारे देण्यात आली आहे. इतकेच नाही जिवे मारणा-यास ५.५ लाख रुपये देण्यात येतील, अशा आशयाचा एक फतवा फेसबुकवर पोस्ट काढण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. फेसबूक पोस्ट टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पश्चिम आगरतळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कारवाई सुरु असल्याचे त्रिपुराचे पोलीस प्रमुख अभिजीत सप्तर्षी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. फतवा पोस्ट करणा-या व्यक्तीचा शोध लावण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. अशा प्रकरणात काही वेळ लागतो. तरीही या आरोपीला आम्ही निश्चित शोधू असा विश्वासही पोलीस प्रमुखांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे काय? असा प्रश्न केला असता पोलीस महासंचालक के.व्ही. श्रीजेश म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना अगोदरच झेड प्लस सुरक्षा आहे. सुरक्षा आणखी वाढवायची असल्यास व्हीआयपींच्या सुरक्षेवर विचार करणा-या समितीकडूनच निर्णय घेतला जाईल.त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यारी पोस्ट हटविण्यात आली आहे. फतवा जारी करणा-या व्यक्तीने एका मुलीच्या फोटोसह रिया रॉय नावाचा उपयोग केला आहे. त्याने स्वत: वर्ल्ड अँटीकम्युनिस्ट काउन्सिलचा सदस्य असल्याचे नमूद केले आहे. प्रोफाइलमध्ये अन्य माहिती नाही. यापूर्वी पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या बनावट फेसबुक पेजचा शोध लावला होता. त्याचा संबंध इंदूरशी होता.