नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यू प्रकरणावर जलद निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला मंगळवारी दिले. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. तथापि या प्रकरणाच्या कार्यवाहीबाबत आमिन या संतुष्ट नाहीत. अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. एसआयटीने तपास करावा आणि मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी करावी, असे त्या म्हणाल्या.फिर्यादी पक्षाने गेल्या आठवड्यात अभिनेता सूरज पांचोली याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सूरजने जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सूरजविरुद्ध हत्येचा आरोप लावून या खटल्याची सुनावणी केली जावी, असेही फिर्यादी पक्षाने म्हटले होते. २५ वर्षीय जिया ही ३ जून २०१३ रोजी मुंबईतील घरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळली होती.>जियाच्या आईची तक्रार...सुनावणी न्यायालय अनुचित पद्धतीने सुनावणी करीत आहे आणि विशेष सरकारी वकिलाच्या गैरहजेरीत या प्रकरणाची सुनावणी केली जात आहे, अशी तक्रार जियाची आई राबिया आमिन हिने केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जूनला होईल.
जिया प्रकरण जलद निकाली काढा !
By admin | Published: May 18, 2016 4:28 AM