नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला व मेहबूबा मुफ्ती यांच्यावर नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) कारवाई केल्याबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्या दोघांची मुक्तता करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, कोणत्या कारणांसाठी त्यांच्यावर पीएसए कायद्यानुसार कारवाई केली, हे कळले पाहिजे. ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांनी राज्यघटनेचा कायमच आदर राखला असून, फुटीरतावाद्यांविरोधात आवाज उठविला आहे. या दोघांनी विद्वेषी राजकारण, हिंसाचाराला कधीही थारा दिलेला नाही.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे की, कोणत्याही आरोपाविना एखाद्याला स्थानबद्ध करणे, ही घृणास्पद गोष्ट आहे. या दोन नेत्यांवर नागरी सुरक्षा कायद्यांतर्गत केलेल्या कारवाईचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. सध्या देशात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे अराजक माजेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग यांनी केलेल्या प्रेरक आंदोलनांचा व इतिहासाचा पंतप्रधानांना विसर पडला आहे.
‘केंद्राचा दावा फोल’
जम्मू- काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे, हा केंद्र सरकारचा दावा ओमर अब्दुल्ला व मेहबूबा मुफ्ती यांच्यावर केलेल्या कारवाईने फोल ठरला आहे, अशी टीका माकपने शुक्रवारी केली. या पक्षाने म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून काश्मीरमध्ये हजारो लोकांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे.
कित्येक लाख लोकांचे सर्वसामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. केंद्र सरकारच्या काश्मीरमधील कारवाईने भारतीय राज्यघटना व लोकशाहीचा अवमान झाला असल्याचेही माकपने म्हटले आहे. ओमर व मेहबूबा यांची मुक्तता करण्याची मागणीही या पक्षाने केली आहे.