- मयूर पठाडे
जगाला मानवतेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती. वैशाख पौर्णिमेच्या म्हणजेच बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला. विश्वात हा दिवस मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो.
आत्मशुद्धी आणि आत्मनिरिक्षणाची विपश्यना ही अत्यंत प्राचीन अशी साधना आणि ध्यानपद्धती. भारतातील अतिप्राचिन ध्यानपद्धती म्हणून तिला मान्यता आहे. काळाच्या ओघात ही साधना लुप्त झाली होती. सुमारे 2500 वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी तिला पुन्हा शोधून काढलं आणि सर्वसामान्यांत तिचा प्रचार, प्रसार केला. आज भारत, नेपाळ, र्शीलंका, म्यानमार, सिंगापूर, जपान, कंबोडिया, चीन, थायलंड, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया. यासह इतरही अनेक देशांत विपश्यनेचा फार मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो.
संयम, सदाचार, शांती, मनावर नियंत्रण आणि आत्म्याला निर्मळ बनवण्यासाठी पूर्वी ऋषिमुनींकडून मोठय़ा प्रमाणात या साधनेचा वापर केला जात होता. महात्मा गौतम बुद्धांनी या साधनेला आणखी सोपं, सरळ रुप दिलं आणि जगभरात तिचा प्रचार, प्रसार केला. ‘जीवन जगण्याची कला’ म्हणून आज ती सर्वत्र प्रसिद्ध आहे. मन:शांती आणि अनेक विकारांवर ही साधना उपयुक्त मानली जाते.
काय आहे विपश्यना?
स्वनिरिक्षणातून स्वपरिवर्तन घडवणारी ही साधना एक जीवनशैली आहे. आपले विचार, संवेदना, भावना आणि निर्णय ज्या निकषांवर चालतात, त्याचे सिद्धांत विपश्यनेच्या आचरणातून स्पष्ट होत जातात. यामुळे मनाला संतुलन प्राप्त होतं. आंतरिक शांती आणि सामंजस्याचा अनुभव येतो. तथागत गौतम बुद्धांच्या काळापासून विविध आचार्यांच्या अखंड साखळीतून विपश्यनेची ही परंपरा चालत आली आहे. अलीकडच्या काळात सत्यनारायण गोएन्का यांनी ही परंपरा मोठय़ा प्रमाणात चालवली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे विपश्यनेचे मोठे केंद्रही आहे. जगभरातून भाविक येथे विपश्यना साधना शिकण्यासाठी येत असतात.
विपश्यनेपासून होणारे लाभ
1- रोग, शोक आणि सांसारिक दु:खापासून मुक्ती मिळवण्यासाठी ही साधना खूपच उपयुक्त मानली जाते.
2- मन:शांतीसाठी ही एक प्रभावी साधना आहे. अनेकदा डॉक्टांकडूनही या साधनेची शिफारस केली जाते.
3- मन, शरीर आणि कृती यांचं संतुलन राखण्यासाठी ही पद्धती अत्यंत प्रभावी आहे.
4- अनेक विकारांवरही ही साधना खूप उपयुक्त आहे. विशेषत: असे विकार, खरे तर ते विकार नाहीत, पण आपल्या मनाच्या खेळांमुळे ते तयार झालेले आहेत, अशा विकारांवर विपश्यना अत्यंत उपयुक्त आहे.
5- अशा विकारांचं या साधनेमुळे समूळ उच्चाटन होऊ शकतं.
6- मानसिक औदासिन्य, आळस, निद्रानाश, उदासपणा, इष्र्या, द्वेष, काहीही करावंसं न वाटणं, भाव-भावनांचा उद्रेक यासारख्या परिस्थितीवर तर विपश्यना हा रामबाण उपाय आहे.
7- या साधनेमुळे मनाची प्रसन्नता, एकाग्रता, उत्साह, आनंद, कोणत्याही समस्येला धीरानं सामोरं जाण्याची आपली शक्तीही वाढते.