नवी दिल्ली : स्कॉर्पिन पाणबुडी कागदपत्रे फुटीमागील जागल्याने (व्हिसलब्लोअर) या पाणबुडीचे सामर्थ्य आणि युद्धक्षमतांविषयीची माहिती असलेली हजारो पाने सामावलेली डिस्क आॅस्ट्रेलिया सरकारला देण्याची तयारी दर्शविली आहे. आॅस्ट्रेलियातील एका वृत्तपत्राने ही माहिती दिली. गोपनीय कागदपत्रांच्या फुटीमागे असलेला जागल्या जगाच्या दृष्टीने अज्ञात असला तरी आॅस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती कळली आहे. या वृत्तपत्राने गेल्या आठवड्यातील अंकात म्हटले की, सोमवारी दुपारपर्यंत फ्रान्स आणि भारत यापैकी कोणालाही कागदपत्रांच्या फुटीची माहिती नव्हती. फ्रेंच संस्था ‘डीसीएनएस’कडे या मुद्द्यावर वृत्तपत्राने कागदपत्र फुटीवर प्रतिक्रिया मागितली, तेव्हा ते त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. जागल्याने वृत्तपत्राला सांगितले की, या पाणबुडीच्या उभारणीतील आॅस्ट्रेलियाचा भावी भागीदार असलेल्या फ्रान्सने भारताच्या नव्या पाणबुडीशी संबंधित गोपनीय कागदपत्रांवरील नियंत्रण गमावले आहे. आॅस्ट्रेलिया सरकारच्या ५0 अब्ज डॉलरच्या पाणबुडी प्रकल्पाचे भवितव्य भारतीय पाणबुडीप्रमाणे धोक्यात येऊन यासाठी सरकार आणि डीसीएनएसने सुरक्षा व्यवस्थेत संपूर्ण बदल करण्याची गरज आहे. तसा ते करतील, अशी अपेक्षा जागल्याने व्यक्त केली आहे. वृत्तपत्राने म्हटले की, या जागल्याने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, तसेच तो कोण आहे, हेही अधिकाऱ्यांना माहीत आहे. हजारो गोपनीय कागदपत्रे, हजारो डिस्क सरकारला सोपविण्याची त्याची तयारी आहे. सोमवारी ही डिस्क सरकारला सोपविली जाऊ शकते.
स्कॉर्पिनची डेटा डिस्क मिळणार
By admin | Published: August 28, 2016 12:20 AM