नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते महत्त्वाकांक्षी किसान ऋण पोर्टलचे विमोचन नुकतेच करण्यात आले. अनेक सरकारी विभागांच्या सहकार्यातून हे पोर्टल विकसित करण्यात आले असून किसान क्रेडिट कार्डच्या (केसीसी) अंतर्गत येणाऱ्या सेवा या पाेर्टलद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांचा डेटा, कर्ज वितरण, व्याज साह्य आणि अन्य माहिती पोर्टलवर उपलब्ध असेल. केसीसी कर्जधारकांशी संबंधित माहिती किसान ऋण पोर्टलवर उपलब्ध होईल. सर्व केसीसीधारकांची पडताळणी आधारच्या माध्यमातून केली जाईल. त्यातून पात्र शेतकऱ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत होईल. या पोर्टलच्या माध्यमातून लाभधारकांच्या थेट खात्यात व्याज सवलत उपलब्ध होईल.
क्रेडिट कार्डाची सुविधा पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी आणि थकबाकीदार शेतकरी याचीही माहिती सरकारला उपलब्ध होईल. पोर्टलसोबत ‘घर घर केसीसी अभियाना’ची सुरुवात करण्यात आली आहे. यातून सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाची सुविधा दिली जाईल.