नवी दिल्ली, दि. 19 - सलूनमध्ये जावून वारंवार मानेची मालीश करून घेणं दिल्लीच्या अजॉय कुमार सिंग यांना चांगलंच महागात पडलंय. सातत्याने मानेला झटका देऊन अजॉय कुमार यांच्या मानेच्या दोन्ही शिरांना लकवा मारला आहे. श्वास घेण्यास त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यांच्या या त्रासावर कोणताही उपचार नसून त्यांना आता आयुष्यभरासाठी कृत्रिम श्वासोच्छवासाची मदत घ्यावी लागत आहे.
अजय कुमार हे नेहमीप्रमाणे सलूममध्ये गेले होते. तिथे त्यांनी सलूनवाल्याकडून मान मोडून घेतली. पण घरी आल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्रास वाढल्यामुळे तात्काळ ते मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हृदयविकारामुळे श्वसनाचा त्रास होत असल्याचं त्यांना वाटलं. मेदांता हॉस्पीटलच्या रेस्पिरेट्री अॅंड स्लीप मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. आनंद जैस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजॉय कुमार यांना तीन महिन्यांपासून श्वसनाचा त्रास होत होता. तीन महिन्यात त्यांच्यावर उपचार झाले पण श्वसनाचा त्रास कमी होत नव्हता. त्यानंतर मानेच्या ज्या शिरा श्वसनावर नियंत्रण ठेवतात, त्यांना लकव्याप्रमाणे झटका आला असल्याचं निदान झालं. त्यामुळे त्यांची श्वसनयंत्रणाच निकामी झाली, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या दिनक्रमाची माहिती घेतल्यावर दर दोन-तीन आठवड्यात सलूनमध्ये जाऊन डोक्याची मालीश करणं आणि मान मोडून घेणं त्यांची सवय असल्याचं कळालं. त्यानंतर सलूनमध्ये मानेला झटका देण्याचा प्रकार झाल्यामुळे श्वसनयंत्रणा निकामी झाल्याचं डॉक्टरांनी ठामपणे सांगितलं.
श्वसनाच्या सर्व शिरा मानेच्या हाडातून जातात. त्यामुळे झोपताना त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. सलूनमध्ये मान मोडल्यामुळेच त्यांच्या मानेच्या दोन शिरांना लकवा मारला असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
भारतात सलूनमध्ये मान मोडण्याचे प्रकार सर्रास केले जातात. पण अशाप्रकारच्या मसाज धोकादायक असल्याचं आता समोर येत आहे.